श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर वास्कोत दगडफेक!

वास्कोत दोन गटांत तणाव: जमावाकडून एकाला मारहाण; पोलिस बंदोबस्तात वाढ
Increase in police coverage
Increase in police coverageDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: श्रीरामनवमीदिनी उपासनगर-कुठ्ठाळी येथून आलेल्या शोभायात्रेवर बायणा - वास्को येथे दगडफेक केल्याने प्रकरण बरेच तापले असून या प्रकरणी वास्को पोलिस स्थानकात तीन वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वास्कोत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सध्या वातावरण जरी वरवर शांत दिसत असले तरी आत आग धुमसत आहे.

ही घटना काल रात्री घडली. यावेळी इस्लामपूर येथे एका व्यक्तीला मारहाण केल्यामुळे वाद आणखीनच चिघळला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण नियंत्रणात आले. आल्या आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून संबंधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक शेख सलीम यांनी दिली.

Increase in police coverage
खाण खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडेच...

रविवारी रामनवमी असल्याने उपासनगर - कुठ्ठाळी परिसरातील रामभक्तांनी वाहनांसह भव्य रथयात्रा काढली होती. रथयात्रा इस्लामपूर येथे पोहोचताच रथयात्रेवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा इस्लामपुरात असल्याची माहिती मिळताच रामभक्तांनी तेथे जाऊन एका तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थांनी तेथील मशिदीसमोर जाऊन घोषणा दिल्याने प्रकरण आणखीनच चिघळले. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर घटनास्थळी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.

वास्को पोलिस स्थानकावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते. तसेच इतर तालुक्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कुठ्ठाळी ते वास्को मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला.

वास्कोत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मडगाव पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, फोंडा पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील, वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रेशियास, दाबोळीचे पोलिस निरीक्षक परेश नाईक व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

बायणा येथे रामभक्तांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच भाजपचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा पोलिस स्थानकावर दाखल झाले. तसेच या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे संघटन मंत्री सतीश तोंड वास्कोत रविवारी रात्री उशिरा दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

दरम्यान, इस्लामपुरातील मशिदीवर जमावाने हल्ला केल्याच्या घटनेचा अखिल गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष नजीर खान यांनी निषेध केला आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने सर्व मुस्लिम बांधव मशिदीत बसून रोजा व प्रार्थना करीत असताना जमावाने मशिदीत येऊन हल्ला केला. शांतताप्रिय गोव्यात अशाप्रकारची घटना कधीच घडली नाही. बायणा इस्लामपूर परिसरात मुस्लिम बांधावांबरोबर हिंदू बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत असल्याने येथे कधीच दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण झाला नाही. रामनवमीदिनी काढलेल्या रथयात्रेत कोणी दगडफेक केली म्हणून मुस्लिम बांधवांवर हल्ला करणे चुकीचे आहे. तसेच जमावाने एका विशेष मुलाला मारहाण करून चूक केली असल्याचे खान यांनी सांगितले.

Increase in police coverage
'गोव्यातील औद्योगिक वसाहतींकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष'

दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारी : रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक व मशिदीवर हल्ला या घटनांमुळे दोन्ही गटांमध्ये वाद चिघळला व बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरणावर नियंत्रण आणले. नंतर दोन्ही गटांनी वास्को पोलिस स्थानकावर येऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या.

वास्को उपअधीक्षक, निरीक्षकाची बदली

तणावाची स्थिती सक्षमरीत्या हाताळण्यास अपयश आल्याबद्दल मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख आणि वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नितीन हलर्णकर यांची तडकाफडकी गोवा राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालय अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी आज जारी केलेल्या आदेशात त्यांच्या जागेवर उपअधीक्षक नीलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com