खाण खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडेच...

मुख्यमंत्र्यांवर दबाव: वीज खाते ढवळीकरांना देण्याची मागणी
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारात समाविष्ट केलेले तीन मंत्री व उर्वरित पाठिराखे आमदार यांना महामंडळे प्रदान करण्याच्या प्रक्रियेवर आज शेवटचा हात फिरवला. (मंगळवारी) तीन मंत्र्यांची खाती व महामंडळे एकाबरोबरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी खात्यांच्या संदर्भात प्रक्रिया सुरू केली, ते उद्या ही खाती जाहीर करतील’, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

CM Pramod Sawant
'भाजप नवीन काही देणार नाही, गेल्या दहा वर्षांची पुनरावृत्ती करेल'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या ‘सुकाणू’ समितीने मुख्यमंत्र्यांनी खाण खाते स्वतःकडेच ठेवावे, असा आग्रह धरला आहे. खाण उद्योग गोव्यात लवकर सुरू व्हावा यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी, डंप धोरण जाहीर केले आहे त्याची कार्यवाही लवकर सुरू व्हावी व मूलभूत खाण धोरण तयार व्हावे यासाठी हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच असणे आवश्यक आहे, अशी माहिती सुकाणू समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली.

‘खाण उद्योग राज्याच्या विकासाशी रोजगार तसेच अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही स्थितीत इतरांना देऊ नये, अशी सूचना आम्ही त्यांना यापूर्वीच केली आहे,’ अशी माहिती या सूत्राने दिली.

गेली चार वर्षे आम्ही खाणी कधी सुरू होणार, अशी विचारणा सरकारजवळ करतो आहोत. मनोहर पर्रीकर यांच्या आजाराच्या शेवटच्या काळातही आम्ही त्यांच्याशी बोलणी केली होती. खाण महामंडळ सुरू करण्याचा विषय त्यांच्याशी उपस्थित केला होता व त्यांनी हा विषय आपण अधिकाऱ्यांबरोबर बोलून तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन आम्हाला दिले होते. सुकाणू समितीला राज्यात महामंडळ सुरू होऊन खाण व्यवसाय महामंडळाच्या आशीर्वादाने चालावा असे वाटते. महामंडळाचे अध्यक्षपद स्वतः मुख्यमंत्री आपल्या ताब्यात ठेवणार असल्याने त्यांच्याकडेच खाण खाते असावे, अशा भावना भाजपच्या सुकाणू समितीच्या आहेत.

CM Pramod Sawant
पोलीस उपअधीक्षक आणि निरीक्षकांची तडकाफडकी बदली

सुदिन ढवळीकर यांना वीज खाते देण्यात यावे. कारण ढवळीकर हे अनुभवी आणि कार्यक्षमही आहेत. ते खाते लोकांशी संपर्क येतो म्हणून केवळ भाजपच्याच सदस्याच्या ताब्यात ठेवण्यात काही साध्य होणार नाही. गेली पाच वर्षे या खात्याचा बट्ट्याबोळच उडालेला आहे. केवळ तम्नार प्रकल्प आणण्याची घाई करण्यात आली, परंतु शहरातील विजेचे खांब गेली दहा वर्षे त्याच स्थितीत आहेत. भूमिगीत वाहिन्या घालण्यात आलेल्या नाहीत. दहा वर्षे वीज खात्याची अशी अवस्था भाजपच्या काळातच झाली. त्यामुळे या खात्याचे अपयश भाजपला अमान्य करता येणार नाही, अशी सडेतोड भावना भाजपच्या संघटनेतील एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’कडे व्यक्त केली. ते म्हणाले, हे खाते भाजपकडे ठेवण्यापेक्षा ते योग्य व्यक्तीकडे सोपवले जाणे सर्वच दृष्टीने राज्याच्या हिताचे आहे.

मगोपचे सुदिन ढवळीकर यांना महत्त्वाचे खाते देण्यात यावे, अशा सूचना काल पक्षश्रेष्ठींनीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वतः पंतप्रधान या घटनेकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. इतर मंत्र्यांना मत्स्योद्योग व समाजकल्याण ही खाती देता येतील, अशा सूचना वरून आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com