
Negligence At T B Cunha Statue Area Goa
वास्को: गोव्याचे थोर स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांच्या पुतळ्याभोवतालच्या परिसराची दुर्दशा झाली आहे. चबुतऱ्याभोवती कचरा जमा झाला आहे. कारंजांच्या पाईपची व ग्रिल्सची मोडतोड झाली आहे. सध्या हा परिसर पाव, फळे विक्रेत्यांचा व वाहन पार्किंगचा तळ झाला आहे. रात्रीच्या वेळी तेथे भटक्या व्यक्ती दिसतात. तेथे गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या दिसतात. या थोर
स्वातंत्र्यसेनानीच्या पुतळ्याची देखभाल करण्यास, पुतळ्यासभोवतालच्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मुरगाव पालिकेला वेळ नसल्याचे दिसून येते.
येथील खारीवाडा चौकात थोर स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली तसेच आसपास भटके लोक बसत होते. पावसाळा वगळता इतर मोसमांमध्ये भटके लोक तेथे झोपत असत.
याप्रकरणी दखल घेताना पुतळ्याच्या सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी हाती घेतले होते. त्यांनी या परिसराला एक नवे रूप दिले होते. पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवती कारंजी बसवली होती. त्या कारंज्यातील पाण्यावर विविध रंगाच्या दिव्याचे प्रकाशझोत टाकण्यात आले होते. या सुशोभिकरणामुळे सायंकाळच्या वेळी हा परिसर आगळावेगळा दिसत होता. सायंकाळी लोक मुद्दाम या परिसरात येत होते.
तथापी हे सुशोभिकरण काही महिने टिकले. नंतर पुतळ्याच्या देखभालीकडे व परिसर सौंदर्यीकरणाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. नव्या पिढीला कुन्हांची माहिती देण्याची गरज व्यक्त करतात. परंतु प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचे दिसून येते.
पुतळ्यासमोरच पावविक्रेत्यांनी तसेच फळ विक्रेत्यांनी, मिनी बसेसनी तळ ठोकला आहे. तेथील कारंजे, विविध रंगीत दिवे नादुरुस्त झाल्याने त्यांचा वापर बंद आहे. तिथेच कदंब शटल बसस्थानक आहे. येथून पणजी, मडगावला बसेस सुटतात. त्यामुळे गोव्याबाहेरील लोकही येथे बससाठी येतात. तेव्हा हा पुतळा दिसतो. मात्र, तो कोणाचा आहे, यासंबंधी ते संभ्रमात पडतात. कारण तेथे स्वातंत्र्यसेनानी कुन्हा यांच्यासंबंधी माहितीफलकही नाही.
पुतळा परिसराची दुर्दशा पाहून सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी एकदा तेथील साफसफाई केली होती. आताही त्यांनी तेथील दुर्दशेबद्दल आवाज उठविला आहे. मुरगाव पालिका तसेच स्थानिक आमदारांनी तेथे लक्ष घालावे,अशी विनंती पोळजी यांनी केली आहे. तेथे नियमित साफसफाई व्हावी, यासाठी मुरगाव पालिकेने कामगार नेमण्याची गरज आहे. कुन्हांच्या पुतळ्यासभोवतलचा परिसराचे सौंदर्यीकरण होण्यासाठी मुरगाव पालिका, लोकप्रतिनिधी पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.