मडगाव जुन्या बाजारांतील पुरुमेंत फेस्त फेरीतील स्टाॅलवाल्यांनी आज नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची भेट घेतली व आपल्या स्टॉलसाठी आकारले जाणारे शुल्क जास्त असल्याचे सांगून ते कमी करण्याची मागणी केली. नंतर शिरोडकर यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली व हे शुल्क 8 हजार रु. निश्चित केल्याने स्टॉलधारकांना दिलासा मिळाला.
यावेळी स्टॉलवाल्यांनी फेरीबाबतच्या आपल्या अन्य समस्या त्यांच्याकडे मांडल्या व त्यांनी त्या दूर करण्याचे आश्वासनही दिले. नंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष म्हणाले की गत फेस्त फेरीत आपण स्वतः लक्ष घातले व त्यामुळे आजवरचा सर्वाधिक 35 लाख रु. महसूल पालिकेला मिळाला.
या फेरीबाबत काही एनजीओ व अन्य काही व्यक्ती हरकतीचे मुद्दे उपस्थित करतात, पण त्यात काहीही तथ्य नाही. कारण पालिकेचाही स्वतःचा खर्च असतो. सरकारही त्यांना स्वतःचा महसूल उभा करण्यास वारंवार सांगते, त्यामुळे अशी पावले उचलणे भाग आहे.
सदर जागा पालिकेने पार्किंगसाठी संपादन केलेली आहे. पण सदर प्रकल्प अजून काही उभा झालेला नाही व म्हणून तोपर्यंत त्या जागेचे काय करायाचे ते ठरवण्याचा अधिकार निश्चितच पालिकेला आहे. पालिकेच्या विनंतीनंतर अजून ‘जी सुडा’ने पार्किंग प्रकल्पाबाबतच कोणताच तपशील सादर केलेला नाही.
दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष-मडगाव
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.