Goa Culture: काणकोण तालुक्यातील आमोणे-पैंगीण येथील श्री बलराम एज्युकेशन सोसायटीतर्फे आदर्श युवा संघ व कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 8 ते 10 डिसेंबर दरम्यान ‘लोकोत्सव 23 ’चे आयोजन आदर्शग्राम येथे करण्यात आले आहे.
पारंपरिक लोकनृत्य, खाद्यपदार्थ, खेळ व साहसी उपक्रमाबरोबरच राज्यस्तरीय विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. या लोकोत्सवाला 6 राज्यांचे सभापती उपस्थिती लावतील. लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती संघाचे संस्थापक तथा सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तवडकर म्हणाले की, आदर्श युवा संघ गेली २२ वर्षे लोकोत्सवाचे आयोजन करत आहे. लोकसंस्कृतीचे आदान प्रदान व्हावे या हेतूने यंदाही लोकोत्सवात भारतातील विविध राज्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा लोकोत्सव हा देशव्यापी लोकसंस्कृतीच्या कलेचा उत्सव होईल.
काणकोण तालुक्यातील लोलये, आगोंद पंचायत व काणकोण नगरपालिका पाळोळे येथे राष्ट्रीय पातळीवरील लोक संस्कृतीचा कार्यक्रम होणार आहे. या लोकोत्सवाला उत्तरप्रदेशचे सभापती सतिश महाना, हरियाणाचे सभापती जिआन चांद, उत्तराखंडचे सभापती रितू खंडुरी भूषण, गुजरातचे सभापती शंकरभाई चौधरी, आसामचे सभापती बिस्वजीत देयमारी व महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर उपस्थिती लावणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या लोकोत्सवातील आकर्षणामध्ये पारंपरिक फुगडी व लोकनृत्य महोत्सव आहे. राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, 45 विद्यालये, 26 उच्च माध्यमिक विद्यालये, 18 महाविद्यालये व संस्थांसाठी या स्पर्धा आहेत. सुमारे 5 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
सुमारे 500 स्टॉल्स उभारणार
पारंपरिक वनौषधींचे प्रदर्शन व विक्री होणार असून त्यामध्ये 100 हून अधिक वैद्य आपली वनौषधे उपलब्ध करणार आहेत. पारंपरिक खाद्यपदार्थ यामध्ये तेलमुक्त पदार्थाचा समावेश असेल. गोव्यातील खेड्यापाड्यातून अनेक लोक त्याचा आस्वाद घेण्यास येथे येतात. पारंपरिक हस्तकला, कंदमुळांचे प्रदर्शन व विक्री, वैज्ञानिक व अत्याधुनिक शेती यंत्रांचे प्रदर्शन, आदिवासींच्या राहणीमानावर आधारित प्रदर्शन, लँडस्केप गार्डन, विज्ञान प्रकल्प स्पर्धा याचा समावेश असेल. सुमारे 500 स्टॉल्स या लोकोत्सवात असतील.
मान्यवरांचा सत्कार
गोव्यामध्ये ज्या व्यक्तींनी विविध क्षेत्रामध्ये आपले योगदान दिलेले आहे त्या व्यक्तीचा सत्कार सोहळा दरवर्षी लोकात्सवातून केला जातो. त्यात 60 ते 70 मान्यवरांचा सत्कार केला जातो. पारंपरिक खेळांचा महोत्सव यामध्ये समावेश केला असून सुमारे 600 क्रीडापटू सहभागी होणार आहेत, असे तवडकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.