Ponda News : फोंडा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत; विधानसभेवर नजर

Ponda News : वास्तविक सध्या फोंडा तालुक्यात एका राजेश वेरेकरांचा अपवाद वगळता कॉंग्रेसकडे कोणताही नेता नाही.
goa
goaDainik Gomantak

मिलिंद म्हडगुत

Ponda News :

फोंडा, दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस उमेदवार विरियोतो फर्नांडिस यांच्या विजयाने फोंडा तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावले असून त्याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणूक निकालाने फोंड्यातील कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून समीकरणे बदलण्याच्या वाटेवर असल्याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.

वास्तविक सध्या फोंडा तालुक्यात एका राजेश वेरेकरांचा अपवाद वगळता कॉंग्रेसकडे कोणताही नेता नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांचा पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. नंतर झालेल्या पंचायत व पालिका निवडणुकीतही कॉंग्रेसला ठसा उमटवता न आल्याने तालुक्यात कॉंग्रेसला भवितव्य नाही, असा होरा विश्‍लेषकांचा होता. पण लोकसभा निवडणूक निकालाने हा होरा चुकीचा ठरला असून आता कॉंग्रेसही मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसे पाहायला गेल्यास फोंडा तालुक्यातील तिन्ही मतदारसंघात मिळून २१,३३१ मतांची चांगली आघाडी मिळाली असली तरी ही आघाडी कॉंग्रेसला सासष्टीत मिळालेल्या आघाडीपुढे टिकू शकली नाही. हेही तेवढेच खरे आहे. यावेळी फोंडा तालुक्यातील तीन मंत्र्यांसह नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच सगळे भाजपच्या दिमतीला असूनही त्याची परिणती विजयाचा झेंडा रोवण्यात होऊ शकली नाही.

याचा विषाद फोंडा तालुक्यातील तसेच नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. वास्तविक याबाबत फोंडा तालुक्यातील भाजप नेत्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. तिन्ही तालुक्यातील मतदारसंघाचा विचार केल्यास शिरोडा, मडकई, या दोन मतदारसंघात तसा कोणताच मोठा नेता कॉंग्रेस जवळ नसल्यामुळे कार्यकर्त्यांनीच वेळ मारून नेली होती.

मागील विधानसभा निवडणूकीत मडकई मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले माजी आमदार लवू मामलेदार हे कोठेच न दिसल्यामुळे मडकईतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था ‘असूनी नाथ, मी अनाथ’ अशी वाटत होती. शिरोड्यातील तीच परिस्‍थिती होती. त्यामानाने फोंडा मतदारसंघात स्थिती बरी होती. तिथे मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले राजेश वेरेकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्ते किल्ला लढवत होते.

तरीही भाजपचे दिग्गज नेते एकत्र आल्यामुळे तसेच त्यांना मगोची साथ मिळाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमोर कठीण आव्हान होते. असे असूनही फोंड्यातील आघाडी ५,५९८ पुरतीच मर्यादित राहिली. गतवेळी ही आघाडी ३,८८० होती. त्यामुळे सगळी शक्ती एकटवूनही आघाडीत फक्त १५०० मतांनी वाढ होणे हे भाजपच्या दृष्टीने पुरक नाही. असा होरा राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

goa
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

फोंडा नगरपालिका, कुर्टी खांडेपार पंचायत या भाजपकडे असूनही आघाडी विशेष वाढू शकली नाही. तसेच मडकई मतदारसंघात मिळालेली १०,७४८ मतांची आघाडी पुरेशी ठरू शकली नाही. गतवेळी सुदिन ढवळीकर सोबत नसूनही भाजपला सव्वा दोन हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यात यावेळी ८,५०० मतांची वाढ होऊ शकली.

वास्तविक वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मडकईसह फोंड्यातही प्रचार केला होता. त्यामुळे याहून मोठ्या आघाडीची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. दक्षिण गोव्यात भाजपच्या दृष्टीने फोंडा तालुका हे ‘ट्रम्प’ कार्ड होते. सासष्टीतील आघाडी कमी करण्याकरिता या तालुक्याचा भाजपला उपयोग होईल, असे वाटत होते.

स्वतः मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घालून फोंड्यातून जास्तीत जास्त आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच ते पल्लवी धेंपे ५० हजार मतांच्या आघाडीने निवडून येणार, असे सांगत होते. पण निकालाने सगळे अंदाज खोटे ठरवले आता कोठे चुकले, यावर विचारमंथन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

वेरेकरांचे ‘वजन’ वाढले

फोंडा तालुक्यातील कॉग्रेसचे एकमेव नेते राजेश वेरेकर यांचे या लोकसभा निवडणूक निकालाने वजन वाढले आहे. पराभवानंतर गेली दोन वर्षे विशेष सक्रीय नसलेल्या वेरेकरांना या निकालाने एक संजीवनी दिली आहे.

फोंड्यातून मिळालेली ८,५९१ ही मते त्यांना विधानसभा निवडणुकीत उपकारक ठरू शकतात, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. मुख्य म्हणजे ‘वन मॅन शो’ असूनही त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांशी जी टक्कर दिली, त्याचे सध्या फोंड्यात कौतुक होत असून याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com