

Goa Job Scam : विदेशात आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दक्षिण गोव्यातील किमान २० सुशिक्षित तरुणांची एका युवतीने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात सध्या एक गुन्हा नोंदवण्यात आला असून, फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या पाहता गुन्ह्यांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित युवतीने तरुणांना परदेशात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. या बदल्यात तिने प्रत्येकाकडून लाखो रुपये उकळले. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याचे आणि दिलेली आश्वासने खोटी असल्याचे लक्षात आल्यावर या तरुणांनी सामाजिक कार्यकर्त्या फिडोल परेरा यांच्याकडे धाव घेतली. आज परेरा यांनी पीडित तरुणांना सोबत घेऊन दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.
फसवणुकीचे हे जाळे केवळ सासष्टी तालुक्यापुरते मर्यादित नसून केपे आणि काणकोण येथील तरुणांनाही या तरुणीने आपल्या जाळ्यात ओढले आहे. फिडोल परेरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "अनेक तरुणांनी आपले दागिने गहाण ठेवून किंवा कर्ज काढून या तरुणीला पैसे दिले होते. प्राथमिक अंदाजानुसार, या सर्व तरुणांची मिळून ४० ते ५० लाख रुपयांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडित तरुणांना त्यांचे पैसे परत मिळवून देणे आवश्यक आहे."
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, "कोलवा पोलीस स्थानकात सध्या एका तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इतर पीडित तरुणही समोर येत असून, त्यांच्या तक्रारींची शहानिशा करून अधिक गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, लवकरच संशयित तरुणीला ताब्यात घेण्यात येईल."
नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीपासून तरुणांनी सावध राहावे आणि अधिकृत संस्थांमार्फतच परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे दक्षिण गोव्यात एकच खळबळ उडाली असून, या 'लेडी नटवरलाल'चे नेमके कोणाशी संबंध आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.