

Election Commission Voter Verification: दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना निवडणूक आयोगाकडून (ECI) एक धक्कादायक नोटीस मिळाली आहे. या नोटिसीमध्ये त्यांना मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी आपली ओळख सिद्ध करण्यास सांगण्यात आलेय. विशेष म्हणजे, २०२४ ची लोकसभा निवडणुक लढवण्यापूर्वी त्यांनी कडक पडताळणी प्रक्रियेचा सामना केला असतानाही ही नोटीस बजावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माजी नौदल अधिकारी राहिलेले कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की, ते १९८९ पासून सातत्याने मतदान करत आहेत. नौदलातील २६ वर्षांच्या सेवेदरम्यान देशाच्या विविध कोपऱ्यात तैनात असतानाही त्यांनी आपले मत टाकण्यासाठी नेहमीच प्रवास केला आहे. "मी देशाची सेवा केली, लोकसभेचा विद्यमान खासदार आहे आणि नुकतीच माझी सर्व कागदपत्रे पडताळली गेली. तरीही मला माझी ओळख सिद्ध करायला सांगणे हे अनाकलनीय आहे," असे ते म्हणाले.
खासदार विरियातो यांनी या निमित्ताने सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "जर एका खासदाराला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या नोटिसीला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य मतदारांचे काय हाल होत असतील? ही प्रक्रिया नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते." निवडणूक आयोगाच्या या धोरणामुळे सर्वसामान्य माणसाला आपला मतदानाचा हक्क टिकवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून सध्या संपूर्ण देशभरात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि बोगस नावे वगळण्यासाठी एक विशेष पडताळणी मोहीम राबवली जात आहे. ही नोटीस याच मोहिमेचा एक भाग असल्याचे मानले जातेय.
मात्र, लोकप्रतिनिधींनाही अशा नोटिसी पाठवल्या गेल्यामुळे या प्रक्रियेच्या अचूकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.