Elections In Goa: वर्षाच्या सुरुवातीला फोंड्याची पोटनिवडणूक, 2027 मध्ये विधानसभा निवडणुका; राजकीय घडामोडींसाठी क्रियाशील वर्ष

Goa Assembly Election 2027: २०२६ हे वर्ष राजकीय आघाडीवर ’क्रियाशील’ ठरणार असून त्याचे प्रतिबिंब पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटणार आहे हे निश्चित.
ZP elections
ZP electionsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

२०२६साल नुकतेच सुरू झाले आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी-फेब्रुवारीत गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे हे वर्ष ’निवडणूक वर्ष’ म्हणून गणले जाणार आहे. हे पाहता यंदा अनेक राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत. काही कलाटणी देणाऱ्या राजकीय घटनाही या काळात घडू शकतात.

गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यास पुढच्या वर्षी १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या काळात तोपर्यंत सत्तेवर असलेला कॉंग्रेस पक्ष एकदम दुर्बल झाल्यासारखा वाटतो आहे.

२०१२साली मनोहर पर्रीकरांच्या करिश्म्यामुळे जेव्हा भाजप सत्तेवर आला, तेव्हा कॉंग्रेसजवळ बडे बडे नेते होते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेस पलटी मारेल, असे बऱ्याच राजकीय विश्लेषकांना वाटत होते. आणि २०१७साली तशी संधीही आली होती.

त्यावेळी १७ जागा अधिक कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष रोहन खवंटेची जागा यामुळे कॉंग्रेसची बेरीज १८ झाली होती. पण आपसातील दुहीमुळे सर्वांत मोठा पक्ष असूनसुद्धा सरकार स्थापन करणे कॉंग्रेसला जमले नाही. आणि तिथूनच कॉंग्रेसला जी गळती लागली ती अजूनही कायम आहे. त्यामुळेच आता सर्वांचे लक्ष २०२७सालाकडे लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुकीत कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला ११ जागा मिळाल्यामुळे त्यांच्या आशा बाळसे धरायला लागल्या आहेत.

त्यामुळे हे वर्ष त्यांच्याकरता महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या कॉंग्रेसजवळ अनुभवी असा नेता नाही. त्यामुळे गोवा फॉरवर्ड कॉंग्रेसमध्ये विलीन करून त्यांचे नेते विजय सरदेसाईंकडे कॉंग्रेसची सूत्रे द्यावीत, असा एक प्रवाह सध्या पकड घेत आहे.

आता हा विचार प्रत्यक्षात उतरतो की काय, याचे उत्तरही याच वर्षी मिळणार आहे. दुसरे म्हणजे आरजी पक्ष या कॉंग्रेस गोवा फॉरवर्डच्या युतीत सामील होणार की नाही, हेही यंदाच कळणार आहे. झेडपी निवडणुकीत स्वतंत्र चूल थाटून आरजीला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या हे विसरता कामा नये.

त्यामुळे आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर युतीत सामील होणे त्यांच्या दृष्टीने अनिवार्य ठरू शकते. त्यामुळे आरजी कोणती पावले उचलतात हेही याच वर्षी ठरणार आहे. झेडपी निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पानिपत झाल्यामुळे त्यांचा कल युतीकडे झुकत असल्याचे दिसायला लागले आहे. पण हे वाटते तितके सोपे नाही हेही तेवढेच खरे आहे.

जागा वाटपावरून या संभाव्य युतीला तडा जाऊ शकतो. आजचे चित्र पाहिल्यास कॉंग्रेस व आम आदमी या दोन्ही पक्षांचे केंद्रस्थान ’सासष्टी ’ बनले आहे.

त्यामुळे आपने युतीत शिरकाव केल्यास या तालुक्यात जागा वाटप कसे होणार, यावर या युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि हे भवितव्यही याच वर्षी स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजप-मगो युती होणार हे जवळ जवळ निश्चित वाटत असले तरी प्रत्यक्षात काय होते तेही बघावे लागेल.

या झेडपी निवडणुकीत या दोन पक्षांची युती असली तरी ती युती कागदावरची युती वाटत होती. प्रत्यक्षात ही युती कुठेही दिसली नाही. आता त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात की काय, याचे उत्तरही याच वर्षी मिळणार आहे.

सध्या राज्यात घडलेल्या काही घटनांमुळे जनमत भाजपच्या विरोधात असल्याचे प्रत्ययाला यायला लागले आहे. त्याचप्रमाणे साविओ रॉड्रिग्जसारखे भाजपचे काही नेते त्यांना शालजोडीतील अहेर द्यायला लागल्यामुळे त्यांची अधिकच कोंडी होताना दिसायला लागली आहे.

पण सरकार भाजपचे असल्यामुळे ते या कोंडीवर मात करण्याचे प्रयत्न करतील हे निश्चित आहे. आता यात ते किती यशस्वी होतात हेही यंदाच कळणार आहे. येनकेन प्रकारे सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपपुढे जबरदस्त आव्हान उभे राहणार असल्यामुळे ते कोणती रणनीती आखतात, जनतेला कोणत्या आमिषाची गाजरे दाखवतात हेही याच वर्षी बघायला मिळणार आहे.

ZP elections
Goa Assembly Election 2027: कॉंग्रेस-फॉरवर्ड युतीस 27 जागा शक्य! विधानसभेसंदर्भात पाटकर यांचा अंदाज; बुथनिहाय विश्लेषण करणार

त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारही यंदा जोरदार तयारीला लागणार असून मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव होणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीला फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार असल्यामुळे त्याचा निकालही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. त्यात परत एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकाही शहरी भागांतील मतदारांचा कल स्पष्ट करणार आहेत.

ZP elections
Goa Assembly Session: 5 दिवसांचे हिवाळी अधिवेशन, 25 बळींचा हिशोब; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचा मास्टरप्लॅन काय?

आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी तर यावर्षी दर घटनेगणिक झडतच राहणार आहेत. उमेदवारी मिळाली नाही म्हणून किंवा मिळण्याची शक्यता नाही म्हणून या पक्षातून त्या पक्षात जाण्याची लाटही आपल्याला या वर्षी दिसणार आहे.

‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या पावलावर पावले ठेवताना दिसणार आहेत. एकंदरीत २०२६ हे वर्ष राजकीय आघाडीवर ’क्रियाशील’ ठरणार असून त्याचे प्रतिबिंब पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटणार आहे हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com