

मडगाव: हडफडे येथे नाईट क्लबला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर दक्षिण गोव्यातील हॉटेल्सचीही तपासणी सुरू झाली आहे. मागचे तीन दिवस ही तपासणी चालू असून आतापर्यंत तपासलेल्या १५ हॉटेल्स आणि पब्सकडे अग्नीशमन दलाच्या एनओसीसह अनेक प्रकारचे परवाने नसल्याचे समोर आले आहे.
दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासष्टी, मुरगाव आणि काणकोण या तालुक्यातील एकूण १५ आस्थापनांची वेगवेगळ्या खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने तपासणी केली असता सर्व हॉटेल्सकडे एक ना एक कमतरता असल्याचे आढळून आले. यातील काही हॉटेल्स पंचायतीकडून ऑक्युपन्सी मिळालेली नसतानाही चालू असल्याचे दिसून आले.
या तपासणीशी संबंधित असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या १५ आस्थापनांपैकी अनेक आस्थापने अशी आहेत अग्निशामक दलाकडून मिळालेल्या एनओसीची मुदत संपली आहे.
गोवन्स फॉर डेमॉक्रसी या संघटनेचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी गोव्यातील नाईट क्लब्स आणि हॉटेल्स जर आवश्यक असलेले परवाना नसताना चालत असतील तर ती गंभीर बाब आहे. सामान्य लोकांकडे साधा परवाना नसला तरी त्यांना आडकाठी आणली जाते. मात्र ही बेकायदेशीर हॉटेल्स परवाने नसताना खुलेआम चालू असतील तर सगळे प्रशासनच भ्रष्ट झाले आहे आणि या भ्रष्टाचाराला राजकारण्यांचा आशीर्वाद आहे ही गोष्ट स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हडफडे (Arpora) येथे झालेल्या दुर्घटनेतून आता सरकार आणि प्रशासनाने बोध घेऊन राज्यात स्वयंपोषक पर्यटन धोरण मार्गी लावण्याची गरज आहे. अशीच अंदाधुंदी चालू राहिल्यास पर्यटन व्यवसायही ठप्प होईल, असे मत दक्षिण गोव्यातील हॉटेलमालक आणि टीटीएजीचे सदस्य सेराफीन कोता यांनी व्यक्त केले. गोमन्तक टीव्हीच्या साश्टीकार या कार्यक्रमात बोलताना, हडफडे दुर्घटनेमुळे गोव्यातील पर्यटनाची प्रतिमा संपूर्ण देशात आणि विदेशात खराब झाली आहे, असे ते म्हणाले. गोमन्तकचे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.