सासष्टी: किटल-बेतूल येथे औद्योगिक विकास महामंडळाने सनबर्न महोत्सवाला परवानगी नाकारल्यानंतर आज दक्षिण गोव्यात झालेल्या बहुतांश ग्रामसभांमध्ये सनबर्न संगीत महोत्सवाला कडाडून विरोध करण्यात आला. आज बेताळभाटी, वार्का, नुवे, करमणे, कामुर्ली, सारझोरा येथील ग्रामसभांमध्ये सनबर्नविरोधी ठराव मंजूर करण्यात आले.
गोवा सरकारने सनबर्नसारखा महोत्सव आयोजित करू नये. त्या बदल्यात गोव्याची परंपरा, वारसा याला प्रोत्साहन देणारे महोत्सव आयोजित करावेत, असे समाजसेवक रोकेझिनो डिसोझा यांचे म्हणणे आहे.
औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काही दिवसांपूर्वी सनबर्न आयोजकांकडून किटल बेतूल येथे आयडीसी जागेत महोत्सव आयोजित करण्याचा अर्ज आला होता; पण महामंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
राज्य सरकारने मात्र सनबर्न महोत्सवाच्या आयोजनाबद्दल अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हा महोत्सव आयोजित करणारी कंपनी खासगी असल्याने त्यांनी सरकारकडे परवानगी मागितली असेल; पण सरकारने त्यांना परवानगी दिलेली नाही,
अशी सावध भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच घेतली होती. मात्र, सरकारने या महोत्सवासंदर्भातील ठाम भूमिका स्पष्ट करावी, यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दबाव आणला आहे.
हा महोत्सव बेतुल येथील आयडीसीच्या पठारावर २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार असल्याचे आयोजकांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, सरकारी परवानगी नसतानासुद्धा ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्रीसुद्धा धुमधडाक्यात सुरू केली आहे. त्यामुळे सनबर्न आयोजकांवर ग्रामपंचायत मंडळाने तक्रार नोंदवावी, अशी मागणीसुद्धा ग्रामसभांमधून होऊ लागली आहे.
सनबर्न संगीत महोत्सव हा गोमंतकीय परंपरेला साजेसा नसल्याचा सूर सर्वच ग्रामसभांमध्ये आज उमटला. हा महोत्सव म्हणजे अमली पदार्थांचा व्यापार, धनदांडग्यांची मौजमस्ती, तरुणाईला ड्रग्सच्या खाईत लोटणे, अशीच सर्वांची भावना बनली आहे. या सनबर्न महोत्सवामुळे मुलांचे भवितव्य बिघडणार आहे, असे वार्काचे सरपंच सालेसियाना फर्नांडिस यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही, सनबर्न महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्यास आपला ठाम विरोध असेल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, काही हॉटेलवाले, पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजकांना मात्र सनबर्न महोत्सव व्हावा, असे वाटते. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला उभारी मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी हा महोत्सव उत्तर गोव्यात वागातोर येथे व्हायचा; पण वाहतूक कोंडीमुळे त्यांना हा महोत्सव दक्षिण गोव्यात व्हावा, असे वाटते.
ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांच्या म्हणण्यानुसार, अशा महोत्सवांतून पर्यटन उद्योगाची वाढ होत असते. या महोत्सवामुळे २०० कोटी रुपयांची उलाढाल होते, असे सुखिजा यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘सनबर्न’विषयी अतिव प्रेम आहे. ‘सनबर्न’मुळे कधी गोव्याची संस्कृती जागतिक व्यासपीठापर्यंत गेली आहे का? कार्निव्हल आणि शिगमोची तुम्ही बरोबर कराल का? गोमंतकीयांचा अपमान करू नका, असे मत आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी व्यक्त केले आहे.
गुगल सर्च इंजिनवर केवळ ‘सनबर्न’ असे नमूद केल्यावर लगेच या महोत्सवाची नावनोंदणीची जाहिरात दिसते. त्यावर महोत्सवाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे. पासची किंमतही नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.