
‘हत्तीचे खाण्याचे दात वेगळे व दाखविण्याचे दात वेगळे’ ही म्हण आपल्या सरकारला योग्य लागते. अंत्योदय, विकसित भारत, विकसित गोवा, अशा घोषणा करणारे राज्य सरकार खरेच जनतेच्या अपेक्षांना खरे उतरते का? दक्षिण गोव्यातील बहुसंख्य जनता सरकारची निष्क्रियता अनुभवते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. दक्षिण गोव्यातील जनतेसाठी असलेल्या जिल्हा इस्पितळात योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास आरोग्य खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. करोडो रुपये खर्चून उभारलेल्या या इस्पितळात रुग्णांना स्टेचर व व्हीलचेरवर बसून रात्र घालवावी लागते. कधी ही गेला, तर बेड नाही, हेच पालुपद ऐकायला मिळते. इस्पितळात काही आवश्यक असलेल्या रक्त चाचण्या करण्याची सुविधा नाही. विश्वजित बाब, डॉ. प्रमोद साहेब, दोन मजले खाली असलेल्या या जिल्हा इस्पितळात सुविधा कधी प्राप्त होणार? दक्षिणेतील जनता जानना चाहती है! ∙∙∙
‘येताक चुकल्यार वांवांक चुकतात आणि वांवांक चुकल्यार गांवाक चुकतात’ अशी कोकणीत एक म्हण आहे. आपल्या राज्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या परप्रांतीय कामगारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. छत्तीसगड व उत्तर भारतातून येणाऱ्या कामगारांमुळे खून, चोरी, मारामारी, अपहरण सारख्या घटनांत वाढ झाली आहे. सरकार केवळ इशारे देत आहे, मात्र प्रत्यक्षात काही ठोस होताना दिसत नाही. येणाऱ्या कामगारांची पार्श्वभूमी व माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. परवा बेतूल येथे उभे राहत असलेल्या एका खासगी विद्यापीठाच्या कामगारांनी चक्क पोलिसांवर हल्ला करून एका पोलिस शिपायाला गंभीर जखमी केले. गृहमंत्री साहेब आता तरी जागे व्हा, केवळ भिवपाची गरज ना! म्हणून भागणार नाही.∙∙∙
सहा महिन्यात मी पुन्हा येऊ, असे सांगून गेलेल्या त्या पोलिसांनी आपले बोल खरे करून दाखविले. ...आता पुन्हा एकदा मडगाव पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक असलेल्या या सायबाची पोलिस ठाण्यात बरीच वट आहे. गोवा पोलिस राखीव दलात त्याची ट्रान्सफर झाली होती. बदलीचा आदेश आल्यानंतर आपण पुन्हा मडगावात येऊ असे ते सांगून गेले होते. त्यांनी आपले म्हणणे खरे करून दाखविले. अशी काय त्यांच्याकडे जादूची कांडी आहे? याचा उलगडा या ठाण्यातील बड्या सायबांनाही उमजलेला नाही. पॉवरफुल राजकीय गॉडफादर असला तर सर्व काही शक्य आहे, असे या ठाण्यातील अन्य पोलिस दबक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजतात. ∙∙∙
मुंगुल गॅंगवॉर प्रकरणात आतापर्यंत १८ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. काहीजण अजूनही फरार आहे. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांघिक प्रयन्त करून संशयितांना अटक केली असली तरी काही मोजकेचजण आता क्रेडिट घेऊ लागले आहेत. खरे म्हणजे जे राबराब राबले, त्यांना आता खड्यासारखे दूर फेकून देऊन भलतेच शुरवीराचा आवेश आणून आम्हीच संशयितांना पकडले, असे भासवीत आहेत. दिवसाची रात्र आम्ही केली व क्रेडिट भलतेच घेऊन गेले. ‘हेच मम फळ तपाला का?’ असे प्रामाणिक पोलिस बोलून दाखवत आहेत. ∙∙∙
पोलिसांची सुरक्षितता धोक्यात असेल तर सर्वसामान्यांचे काय? सरकार यावर काही तरी ठोस उपाययोजना करणार का? अशी चर्चा सध्या राज्यात जोरदार सुरू आहे. बेतुल येथे पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला होत असेल, तर गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडेल. राज्यात गुन्हेगार एवढे मोकळे कसे फिरत आहेत? जर पोलिसांनाही भीती वाटत असेल तर आम्ही सामान्य लोक सुरक्षित कसे राहणार? सरकारने तत्काळ याची दखल घेतली पाहिजे. लोकांचा सरकारवरील विश्वास डगमगतो आहे, अशा चर्चा खूपच आणि अनेक प्रश्न लोक एकमेकांना विचारू लागले आहे. हा केवळ पोलिसांवरील हल्ला नाही, तर तो संपूर्ण राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरचा हल्ला आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे तर आता लोक खुलेआम बोलत आहे. ∙∙∙
‘कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ या काव्य पंक्ती आता सत्ताधारी भाजपतील आमदार ओवाळायला लागले असणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या माथ्यावर ऐंशी टक्के सरकारी खात्याची जबाबदारी असून मुख्यमंत्री या ओझ्याखाली दबत आहे, असे विरोधकच नव्हे, तर आता सत्ताधारी ही म्हणायला लागले आहेत. मुख्यमंत्र्याकडे स्वतः च्या खात्याबरोबरच आणखी तीन चार मंत्र्याच्या खात्याचा भार आहे, हे विधानसभेच्या सत्राच्या वेळी कळून आले. गेल्या अनेक महिन्यापासून मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्या ऐकायला येतात. मात्र मंत्रिमंडळ बदलासाठी योग्य मुहूर्त मिळत नाही. मुख्यमंत्र्याच्या डोक्यावरील हे ओझे कधी कमी होणार? असा प्रश्न काहींना पडला असणार! ∙∙∙
फातोर्डाचे आमदार विजयबाब यांचा मडगाववर डोळा आहे, हे आता लपून राहिलेले नाही. प्रत्येक वेळी फातोर्डाच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी मडगावचा उल्लेख असतोच. मात्र ते मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर थेट हल्ला करण्याचे टाळतात, असेही दिसून येत आहे. मडगावच्या बहुतेकांना फातोर्डेचा विकास पाहून विजयबाबनी मडगावात यावे, असे वाटते. यात काही भाजपवाल्यांचाही समावेश आहे. ते त्याबद्दल अधूनमधून एकमेकाकडे कुजबुजत असतात. हल्लीच फातोर्डा चकाचक मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी विजयबाबांनी सांगितले, की मडगाव सुद्धा आम्ही चकाचक केले असते, पण यंदा नाही. पुढील वर्षी पाहुया. नगरपालिका निवडणुका एप्रिल-मे २०२६ मध्ये होणार आहेत. म्हणजे नगरपालिकेत विजयबाबांना पूर्ण बहुमताची खात्री आहे, तर अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
भोम चौपदरी रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. ग्रामस्थांना हवाय बगल मार्ग तर सरकार गावातूनच खांब्यांवरील रस्ता बांधण्यासाठी आग्रही आहे. ग्रामस्थ विरोध करताहेत, तर सरकार त्याला जुमानत नाही, मात्र कामही नेटाने सुरू करीत नाहीत, की ग्रामस्थांना कोणतेच आश्वासन दिले जात नाही. त्यामुळे हा वाद संपणार तरी कधी? असा सवाल केला जात आहे. कदाचित येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हा विषय मार्गी लागेल काय... ग्रामस्थच विचारताहेत!! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.