
मडगाव: दक्षिण गोव्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांतच ११ खूनप्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २०२४ साली वर्षभरात दक्षिण गोव्यात अशी फक्त १३ प्रकरणे घडली होती. हे प्रमाण पाहता दक्षिण गोव्यात खुनांचे प्रमाण बरेच वाढले आहे. बहुतांश गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय कामगारांमध्ये होणारी भांडणे हा मुख्य घटक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत दक्षिण गोव्यात ज्या खुनांच्या घडल्या आहेत, त्यातील सर्वाधिक प्रकरणे फोंडा पोलिस स्थानकाच्या कक्षेत येणारी आहेत. तेथे एकूण चार खुनाच्या घटना घडल्या आहेत.
मायणा-कुडतरी आणि मुरगाव या पोलिस स्थानकांच्या हद्दीत प्रत्येकी दोन तर वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव या पोलिस स्थानकांच्या कक्षेत खुनाची प्रत्येकी एक घटना घडली आहे. या सर्व प्रकरणांचा तपास लावण्यास पोलिस यशस्वी ठरले आहेत. काही प्रकरणांत पोलिसांनी संशयितांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे.
गतसाली २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात दक्षिण गोव्यात खुनाच्या एकूण १३ घटना घडल्या होत्या. तर, २०२३ मध्ये फक्त ९ घटनांची नोंद झाली होती. मात्र २०२२ मध्ये तब्बल २५ खुनांच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता २०२५ मध्ये परत एकदा खुनांच्या प्रकरणांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दक्षिण गोव्यात खुनांच्या प्रकरणांत वाढ होण्याचे कारण काय, असे विचारले असता, या जिल्ह्यात औद्योगिक वसाहती अधिक प्रमाणात असून तिथे काम करणारे परप्रांतीय कामगार व त्यांना असणारे दारूचे व्यसन हे त्यामागचे मुख्य कारण असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या कामगारांमध्ये पैशांच्या किंवा अन्य कारणांमुळे होणारे वाद त्यास कारणीभूत ठरत आहेत. अशा प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व परप्रांतीय कामगारांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.