CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याची ‘सुपारी'? समाज माध्यमांवर मोहीम

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष्य करणे सुरू झाल्याने संशयाची सुई ‘आतील'' माणसांवरच भिरभिरू लागली आहे
Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष्य करणे सुरू झाल्याने संशयाची सुई ‘आतील'' माणसांवरच भिरभिरू लागली आहे
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील पर्यावरणाच्या ऱ्हासाला आणि मोठ्या प्रमाणातील भू-रूपांतराला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच जबाबदार असल्याचे संदेश गेले दोन-तीन दिवस राज्यभरातील अनेकांच्या व्हॉटस ॲपवर येऊन थडकू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याची ‘सुपारीच’ कोणीतरी घेतली असावी असा संशय यावा, अशा नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविली जात आहे.

राज्यातील भू-रूपांतराबाबत अनेक बिगर सरकारी संस्था, संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. नगरनियोजन कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीलाही विरोध करण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष्य करणे सुरू झाल्याने संशयाची सुई ‘आतील'' माणसांवरच भिरभिरू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे नसलेल्या खात्यांबाबत त्यांना जबाबदार धरण्यात येत असल्याने यामागे कोणाची तरी राजकीय खेळी असावी, याचाही अंदाज मुख्यमंत्र्यांच्या गोटातून घेतला जात आहे.

भू-रूपांतर प्रश्‍नाचे खापर नेतृत्वावर; भाजप नेते सावध

राज्यात बहुचर्चित १७ (२) आणि ३९ कलमांचा आधार घेऊन केल्या जाणाऱ्या सरसकट भू-रूपांतराबाबत सत्ताधारी गोटातच अस्वस्थता निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांनी याकडे काणाडोळा करू नये, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा होती. असे असताना याचे खापर मुख्यमंत्र्यांवरच फोडल्याने भाजपचे नेते सावध झाले आहेत. यामागे कोणाचा हात असावा, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्याकडून खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विनंती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सतर्क; सूत्रधाराचा शोध सुरू

मुख्यमंत्र्यांनी याविषयी जाहीर भाष्य करणे टाळले असले तरी याची कल्पना त्यांना आहे. होय, मला काहीजणांनी असे संदेश येऊ लागल्याची माहिती दिली आहे. त्याची योग्य ती दखल घेतली जात आहे, एवढेच सांगून त्यांनी हा विषय संपविला तरी निकटवर्तीयांकडूनच ही माहिती बाहेर देऊन ही मोहीम राबवली जात असल्याचे त्यांचे मत आहे. यामागे कोण सूत्रधार असावा, याचाही शोध घेतला जात आहे.

दिल्लीश्‍वरांपर्यंत पोचविले संदेश

या साऱ्या प्रकाराची सुरवात गोव्याबाहेरून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकात भू-रूपांतरविषयक वृत्त प्रकाशनाने झाली होती. त्याआधी काही समाज माध्यमांवर भू-रूपांतराविषयी छोटी वृत्ते, व्हिडिओ प्रसारित होत होते. त्याची मोठी चर्चा होऊन ती दिल्लीतील नेत्यांच्या कानांपर्यंत पोचेल, याची व्यवस्था म्हणे करण्यात आली होती.

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष्य करणे सुरू झाल्याने संशयाची सुई ‘आतील'' माणसांवरच भिरभिरू लागली आहे
CM Pramod Sawant: कामे न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री सावंतांचा इशारा

विशिष्ट मोबाईल क्रमांकांवरून संदेश

या मोहिमेंतर्गत जाणीवपूर्वक व्हॉटस ॲपवर संदेश पसरविणे सुरू झाले. यात काही महिला व पुरुष भू-रूपांतरामुळे मोठा घोटाळा कसा झाला आहे हे सांगताना दिसतात. यामागे मुख्यमंत्र्यांचाच आशीर्वाद कसा आहे, याची माहितीही या व्हिडिओंमधून दिली आहे. वेगवेगळ्या क्रमांकावरून हे संदेश प्रसारित केले जात आहेत.

वजनदार मंत्र्याकडे संशयाची सुई

विशेषतः एका मंत्र्याचे वजनदार खाते काढून घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर हे संदेश व्हॉटस ॲपवर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याने या साऱ्याला आतूनच फूस असल्याचा संशय खुद्द मुख्यमंत्र्यांनाही येऊ लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com