Highway In Porvorim:पर्वरीत होणार सहापदरी मार्ग
Highway In Porvorim: पर्वरीत सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाच्या वर सहापदरी महामार्ग उन्नत पद्धतीने बांधला जाणार आहे. यासाठी ओ कोकेरो चौक ते सांगोल्डा तिठ्यापर्यंतचा रस्ता दोन वर्षासाठी अवजड वाहतुकीला बंद ठेवला जाणार आहे.
सपना गार्डनकडे असलेल्या सरकारी जमिनीतून सांगोल्डा रस्त्याला जोडणारा मार्ग या दरम्यान बगलमार्ग म्हणून वापरात आणला जाणार आहे. या सहापदरी उन्नत मार्गाच्या कामासाठी चक्क 18 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले, की वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पत्रादेवी ते बांबोळी महामार्ग रुंदीकरणापैकी हाच टप्पा मागे राहिला होता. मोपा विमानतळाकडे दक्षिण गोव्यातून वेगाने पोचता यावे यासाठी महामार्ग रुंदीकरण करण्यात येत आहे.
सध्या निविदेला प्रतिसाद म्हणून देकार सादर केलेल्या कंपन्यांनी तंत्रज्ञानविषयक आणि अन्य कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यावर त्या छाननीत उत्तीर्ण ठरणाऱ्या कंपन्यांकडून वित्तीय देकार मागवले जातील. साधारणतः या वर्षाच्या अखेरीस हे काम सुरू करण्याचा मानस आहे.
पर्वरी येथे उन्नत मार्गाला काहींनी न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते प्रकरण पोचलेले आहे. तरीही सरकारने उन्नत मार्गाचे काम पुढे रेटण्याचे ठरवले आहे. या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने जूनमध्ये निविदा मागवल्या होत्या. ४७४ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या या कामासाठी २४ महिने दिले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने या उन्नत मार्गासाठी उभारण्यात येणाऱ्या खांबांच्या बांधकामाआड येणारी बहुतांश अतिक्रमणे हटवली आहेत.
केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ६४१ कोटी ४० लाख रुपये मंजूर केले असून त्यात उन्नत मार्गासह त्याच्या जोड रस्त्याच्या खर्चाचाही समावेश आहे. सध्या या मार्गावर ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी हाकता येते, तर उन्नत मार्ग झाल्यानंतर ८० ते १०० किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने चालवता येणार आहेत.
असा असेल महामार्ग
न्यू मॅजेस्टिक हॉटेल ते सांगोल्डा तिठ्यापर्यंत होणार महामार्ग
५.२०० कि.मी. लांबीचा मार्ग.
बांधकामासाठी लागणार दोन वर्षांचा कालावधी.
४७४ कोटी ६० लाख रुपये खर्च.
सपना गार्डनमार्गे वळविणार वाहतूक.
वाहनांची वेगमर्यादा होणार ८० ते १०० प्रतितास.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.