GoaPolitics: खरी कुजबुज; सिद्धेश नेमका कोणत्या पक्षात?

Khari Kujbuj Political Satire: ‘जे चकाकते, ते सगळेच खरे सोने नसते’ अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. पर्यटनाच्या नावावर आपले सरकार कार्निव्हल व शिगमोत्सव आयोजित करण्यासाठी करोडो रुपये खर्च करते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomatnak
Published on
Updated on

सिद्धेश नेमका कोणत्या पक्षात?

सिद्धेश भगतने आम आदमी पक्षाला राम राम ठोकला. पण आता ते नेमके कोणत्या पक्षात सामिल होतील, याबद्दल लोकांमध्ये अंदाज बांधणे सुरू झाले आहे. ज्या प्रकारे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिसने दिल्लीहून खास भगत यांच्या ‘आप’च्या राजीनाम्याचा उल्लेख करून त्याचे गुणगान केले, ते पाहता सिद्धेशबाब कॉंग्रेसमध्ये सामील होतील का? असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. ज्या अर्थी त्यांची काही भाजपच्या नेत्याकडे जवळीक आहे, ते पाहता ते भाजपमध्ये सामील होतील, असे लोकांना वाटू लागले आहे. सिद्धेशबाबने अजून आपली पुढील चाल निश्चित केलेली नाही. कदाचित त्यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवर डोळा असू शकतो. त्यामुळे जो पक्ष त्याला उमेदवारी देऊ करेल, त्या पक्षात ते सामील होण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. सिद्धेशच्या मनात नेमके काय? हे भविष्यात स्पष्ट होईल. थोडा वेळ वाट पहाणे शहाणपणाचे ठरेल. ∙∙∙

पर्यटनाचा शिगमा गाजतो, परंपरेचे काय?

‘जे चकाकते, ते सगळेच खरे सोने नसते’ अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. पर्यटनाच्या नावावर आपले सरकार कार्निव्हल व शिगमोत्सव आयोजित करण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. आता पर्यटनाच्या नावावर आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्निव्हल व शिगमोत्सव मिरवणुकीमुळे किती देशी-विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात, हा संशोधनाचा विषय. हल्लीच्या काळात पहाटेपर्यंत या स्पर्धा सुरू असतात. आता या गोंधळात गावात साजरे करण्यात येत असलेला पारंपरिक इत्रुज व शिगमोत्सव लुप्त होण्याची भीती आहे. पारंपरिक मांड व इत्रुज व शिगमो उत्सव साजरा करण्यासाठी लागणारी पारंपरिक संगीत वाद्ये खरेदी करण्यासाठी सरकारने मदत देण्याची गरज आहे. अन्यथा गावांतील परंपरा रस्त्यावर आणून गावातील पारंपरिक मांड व उत्सव रस्ता चुकण्याची भीती आहे! ∙∙∙

फोन ‘रेकॉर्डिंग’

जोपर्यंत फायदा असतो, तोपर्यंत मित्र. ज्या दिवशी फायदा मिळण्याचे बंद होते, तेव्हा तोच मित्र शत्रू बनतो. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव नवीनच आमदार बनल्यावर त्यांना एका राजकीय सल्लागाराची गरज होती. युरीने एका स्‍वयंघोषित सल्लागाराला जवळ केले. काही दिवसानंतर युरीने त्याला दूर केले. आता कधीकाळी युरीच्‍या निकट असलेले ते व्‍यक्‍तिमत्त्‍व युरीच्या विरोधात सोशल मीडियावर टीका करायला लागले आहे. त्याने म्‍हणे एका युरी समर्थकाला फोन करून युरीच्या विरोधात टिपणी केली, तसेच इतर समाजावरही भाष्य केल्याने ते व्यक्तिमत्त्व वादग्रस्त ठरले आहे. कारण ज्याला त्‍याने फोन केला त्याने फोनचे रेकॉर्डिंग व्हायरल करून उघडे पाडले. बिचारे राजकीय अभ्‍यासक व्‍यक्‍तिमत्त्‍व जातभाईपेक्षा अन्न देणारा जवळचा असतो, हे विसरले. ∙∙∙

केपे मतदारसंघ स्लीप मोडमध्ये?

केपे मतदारसंघाचा विकास खुंटलाय आणि मतदारसंघ स्लीप मोडमध्ये गेल्याचा आरोप होत आहे. आता याला जबाबदार माजी आमदार बाबू कवळेकर, की विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा? यावर मतदारांत चर्चा रंगत आहे. कवळेकर विद्यमान आमदारांना दोष देतात. आपल्या कारकिर्दीत नव्वद टक्के काम पूर्ण झालेल्या पोलिसस्थानक इमारतीला विद्यमान आमदार एक चिराही चढवू शकले नाहीत, याला जबाबदार कोण? उद्‍घाटन झालेली केपे पालिकेची व्यावसायिक इमारत व्यापाऱ्यासाठी खुली होत नाही, यात चूक कुणाची? केपे बाजारात भव्य व्यापारी संकुल उभारण्यासाठी घातलेला भूमिपूजनाचा दगड आजही उघड्यावर पडलाय, यात कोणाच दोष? बस स्थानकाचा प्रकल्प रेंगाळत पडलाय. माजी आमदार म्हणतात विद्यमान आमदार आपण केलेल्या प्रकल्पांचे केवळ फीत कापण्यात मग्न आहेत तर विद्यमान आमदार आरोप करतात माजी आमदार विकास कामात अडथळे आणतात. काही का असेना या वादात केपेकरांचे नुकसान होते, हे मात्र खरे. ∙∙∙

युरींनी सादर केले प्रगती पुस्तक!

राजकारणात जो काम करतो व जनतेचा विश्वास कायम ठेवतो तोच टिकतो. कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव विरोधी पक्षात असल्यामुळे व विरोधी नेते असल्यामुळे त्यांच्याकडून मतदारसंघाचा विकास झाला नाही असा आरोप आता युरी विरोधक करायला लागले आहेत. विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने आता युरी आलेमाव यांना आपल्या कामाचे प्रगती पुस्तक सादर करावे लागले. कुंकळ्ळी मतदारसंघातील नद्यांच्या गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ करताना युरी आलेमाव यांनी आपल्या चार वर्षांच्या काळाचे प्रगती पुस्तक जनतेपुढे ठेवले. विरोधी आमदार असतानाही युरींनी दिलेली आश्वासने कशी पूर्ण केली? केवळ विकासकामेच नव्हे, तर सरकारी नोकऱ्याही कशा मिळवून दिल्या? असा प्रश्न आता युरी विरोधकांना पडला असणार. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; मडगाव नगरसेवक कार्निव्हल मूडमध्ये

पैशांचा महोत्सव, की लोकांचा?

राज्यात सध्या एक वेगळेच गणित सुरू आहे. म्हणे! महोत्सव, उपक्रम, कार्यक्रम, यासाठी सरकारकडे पैशांची कमतरता नाही. उलट एवढा उत्साह, की चार तासांच्या कार्यक्रमासाठीही दोन कोटींचे बजेट सहज मंजूर होते. पण गंमत अशी, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांचे थकलेले पैसे मात्र अजूनही ‘प्रक्रियेत’ आहेत. सरकारी फाईलचा वेग इतका शांत आहे की कासवही त्याला ओव्हरटेक करेल, अशी चर्चा सुरू आहे. सरकार नेहमी सांगते आम्ही काम करतोय, थोडा वेळ द्या. दरम्यान विरोधकांनीही कान टवकारलेत. काही जण म्हणतात, विरोधकांना आता तयार मैदान मिळालंय; फक्त बॅट उचलायची बाकी आहे. पण ते खरोखर चौकार मारतील की फक्त प्रेस कॉन्फरन्समध्येच सराव करतील, हे पाहणे बाकी आहे. एकंदरीत, राज्यात सध्या पैशांची कमतरता नाही. फक्त ते कोणासाठी आणि कुठे खर्च करायचे, यावरच खरी चर्चा रंगली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

खरं कोण बोलतंय?

सध्या गोव्यात दाबोळी विमानतळावरून सरकार व विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. नगरपालिका त्यानंतर विधानसभा निवडणुका असल्याने अशा गोष्टी अपेक्षितच आहेत. पण खरे काय? हे गोमंतकीयांना कसे कळू शकेल हा मोठा प्रश्न आहे. विरोधक म्हणतात, दाबोळी विमानतळ बंद होणार. सरकार म्हणते, दाबोळी विमानतळ कदापि बंद होऊ देणार नाही. पण प्रत्यक्षात परिस्थितीचा आढावा घेतला, तर दाबोळी पेक्षा मोपा विमानतळावरील रेलचेल वाढलेली दिसते. अनेक विमान कंपन्यांनी दाबोळी ऐवजी मोपा विमानतळाची निवड केली आहे. त्यामुळे दाबोळी येथील टॅक्सी चालक, परिसरातील लहान सहान दुकानदारांची परिस्थिती हालाकीची होण्याच्या मार्गावर आहे. याचाच अर्थ असा की दाबोळी विमानतळ एकदम बंद होणार नाही? तर तो हळूहळू बंद केला जाईल, अशीच शक्यता अनेक जण व्यक्त करताना दिसत आहेत ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com