
पणजी : गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून महमंद खान ऊर्फ सिद्दीकी हा पळाला नसून पोलिसांच्या मदतीने त्याला पळवला गेला, असा आरोप करत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सरकारला घेरणे सुरू केले आहे. सिद्धीकी पोलिस कोठडीतून पळून जाण्याच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणावरून आप आणि काँग्रेसने सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
दोन्ही पक्षांनी सरकारवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशाचा आरोप करत, या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक आदींनी आज (सोमवारी) पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर वाल्मिकी म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे.
पोलिस कोठडीतून आरोपी पळतो, याचा अर्थ प्रशासन कमजोर आहे किंवा त्यात अंतर्गत सहकार्याचा संशय आहे. त्यांनी यासंबंधी भाजप सरकारची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
फरारी सिद्दीकी सुलेमानला अटक करणे हे आमचे प्रथम लक्ष्य आहे. त्याला अटक केल्यानंतर व्हिडिओत त्याने केलेल्या आरोपांची तातडीने चौकशी करण्यात येईल.
आलोक कुमार, पोलिस महासंचालक
काँग्रेसनेही या प्रकरणावरून भाजपला घेरत, राज्य सरकारला 'अपयशी' ठरवले आहे. काँग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे नेते म्हणाले, सरकारने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा.
आरोपी पळून जाण्याच्या घटनेमुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात केवळ बडतर्फ पोलिस शिपाई अमित नाईक याचाच हात असल्याचे नमूद केले. सध्या पोलिसांचे लक्ष हे सिद्दीकाला पकडण्यावर केंद्रित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.