

साखळी: हरवळे-साखळी येथील श्री रूद्रेश्वर देवस्थानच्या मुख्य व्यवस्थापन समिती व उपसमितीसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी यशवंत माडकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सातही पदांवर माडकर समर्थकांनी भरघोस मतांनी बाजी मारली.
एकूण १,७२८ पैकी १,१६८ महाजन मतदारांनी या निवडणूक (Election) प्रक्रियेत भाग घेतला. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना ८०० पेक्षा अधिक मते मिळाली. देवस्थान समितीच्या खजिनदारपदी दीपक नाईक, मुखत्यारपदी सुभाष किनळकर, तर सचिवपदी संगेश कुंडईकर यांची निवड झाली. पर्यायी समितीच्या अध्यक्षपदी दिलीप नाईक, खजिनदारपदी विघ्नेश शेट्ये, मुखत्यारपदी वासुदेव गावकर, तर सचिवपदी दामोदर नाईक यांची निवड झाली. हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिराच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सकाळी ८ वाजता नावनोंदणी झाल्यानंतर ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच महाजन मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. दुपारपर्यंत हरवळेतील पांडवकालीन गुंफांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावरही महाजनांच्या रांगा होत्या. भंडारी समाजातील अनेक राजकीय नेते तसेच महाजनांनी मतदानात भाग घेतला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आजी-माजी आमदारांनीही मतदान केले. प्रशासन, पोलिस व देवस्थान समितीच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.
हरवळे येथील श्री रूद्रेश्वर द्रेश्वर मंदिराची व्यवस्थापन समिती व उपसमिती देवस्थान महाजनांमार्फत स्थापन व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्यासाठी आमचा संघर्षही होता. अखेर या संघर्षाला यश आले व समितीची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत आमच्या समर्थक उमेदवारांना ८५० पेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. सर्व महाजनांनी सुरळीतपणे निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदान केले. त्यासाठी सर्व महाजनांचे आभार, असे नवनिर्वाचित अध्यक्ष यशवंत माडकर यांनी म्हटले.
श्री रूद्रेश्वराच्या चरणी गेली अनेक वर्षे कार्य केलेल्या माडकर समर्थक समितीतील महाजनांनाच पसंती मिळाली आहे. हा विजय देव श्री रुद्रेश्वराचा आहे. १,७२६ पैकी १,१६८ महाजनांनी उपस्थित राहून मतदान करणे ही मोठी बाब आहे. या निवडणूक प्रक्रियेत जरी कोणी राजकीय हस्तक्षेप केला असला, तरी आमच्या देवस्थान महाजनांनी आपली ताकद दाखवून दिली आहे, असे नवनिर्वाचित मुखत्यार सुभाष किनळकर यांनी म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.