म्हापसा येथील जागृत देवस्थान आणि म्हापशेकरांसह समस्त भाविकांचा राखणदार म्हणून ख्यातीप्राप्त श्री देव बोडगेश्वराला ‘सोन्याचा दांडा’ अर्पण करण्यात आला आहे. हा दांडा कोल्हापूर येथील कारागिराकडून बनवण्यात आला असून आज 4 जानेवारी 2023 रोजी, देवस्थानच्या वर्धापनदिनादिवशी मंदिरात श्रींना अर्पण करण्यात आला आहे.
या सोन्याच्या दांड्याला सुमारे 67 लाख रुपये खर्च आला असून यासाठी देणगीदारांकडून धनादेश किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच देणगी देण्याचं आवाहन देवस्थानाकडून करण्यात आलं होतं. हा सोन्याचा दांडा श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाच्या दिवसांत आणि श्रावण महिन्यातील सर्व रविवारच्या दिवशी (देवाचा दिवस) मंदिरात ठेवला जाईल, अशी माहिती बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली आहे.
हा सोन्याचा दांडा भक्तगणांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरावा, या हेतूने दूरदृष्टी ठेवून तो बनविला जात आहे. मंदिरात गोव्यासह इतर राज्यांतील भाविक भेट देतात. या सोन्याच्या दांड्यामुळे भाविकांची गर्दी आणखी वाढेल, अशी आशा अॅड. वामन पंडित यांनी व्यक्त केली आहे.
म्हापसा येथील जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वर संस्थानचा 88वा जत्रोत्सव आणि 30 वा वर्धापनदिन सोहळा दि. 4 ते 15 जानेवारी यादरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे दि. 4 रोजी श्री देव बोडगेश्वच्या मूर्तिप्रतिष्ठापनेच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी 10 वाजता लघुरुद्र, पूजा, दुपारी १२ वाजता सोन्याचा दांडा श्रीचरणी अर्पण केला जाईल. यावेळी चंद्रशेखर सिंग व सागर माने यांच्या बॅण्डपथकासह शंखनाद सादर केला जाईल. आरती, तीर्थप्रसादानंतर महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता रांगोळी स्पर्धा, गोड पाककला स्पर्धा व 5 ते 9 व 10 ते 14 वर्षे वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा होईल. 7 वाजता सुहासिनींतर्फे दीपोत्सव, रात्री 8.30 वाजता म्हापसा ओम सत्य साई सेवा मंडळातर्फे प्रार्थना, भजन, रात्री 9.30 वाजता कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ (नेरुल-कुडाळ) प्रस्तुत ‘अजिंक्यतारा : 2’ हा नाट्यप्रयोग होईल.
गुरुवार दि. 5 रोजी श्री देव बोडगेश्वराचा 88 वा जत्रोत्सव दुपारी 12 वाजता गाऱ्हाणे व आरतीसह साजरा होईल. त्यानंतर महाप्रसाद, संध्याकाळी 4 वाजता नवदुर्गा दिंडी पथकातर्फे दिंडीचा कार्यक्रम, 6 वाजता पांडुरंग राऊळ आणि साथींचे भजन, रात्री. 8.30 वाजता अंतरा व साथी कलाकारांतर्फे (महाराष्ट्र) ‘मुद्रा’ हा नृत्याचा कार्यक्रम होईल. रात्री 12 वाजता प्रवीण कळंगुटकर दशावतारी मंडळातर्फे ‘पुनर्जन्म’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 5 वाजता बोरी नवदुर्गा मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, 7 वाजता ‘नृत्य मार्ग’ हा कार्यक्रम श्वेता व साथींतर्फे (मोरजी) सादर होईल. रात्री 8 वाजता म्हापसा पालिकाक्षेत्र मर्यादित एकेरी नृत्यस्पर्धा तर रात्री 11 वाजता श्रींची आरती व प्रार्थना होईल.
शनिवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा पिकअप चालक संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता बालभवनाच्या विद्यार्थ्यांतर्फे ‘रंगारंग’ कार्यक्रम, रात्री 8.30 वाजता ‘मनोमय’ हा सिद्धकला डान्स अकादमी अॅण्ड इव्हेंटस् व जान्हवी बोंद्रे प्रस्तुत सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा मासळी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता लेहरे ग्रुपचा ‘स्वराभिषेक’ हा सांगीतिक कार्यक्रम व रात्री 8 वाजता आरडीएक्स क्रीव महाराष्ट्रतर्फे ‘दिव्यशक्ती’ कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा रिक्षाचालक संघटनेतर्फे (कदंब बसस्थानक) श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता कला व संस्कृती संचालनालय पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री 8 वाजता ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे.
संगीत रसिकांना मेजवानी
मंगळवार दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता पं. प्रवीण गावकर व पल्लवी पाटील यांचा ‘भक्तिभाव’ हा संगीताचा कार्यक्रम तर रात्री 8 वाजता ‘दृष्टी’ ग्रुपतर्फे (महाराष्ट्र) ‘नृत्यताल’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा भाजीविक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता संदेश खेडेकर यांचा ‘स्वरसंदेश’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तर रात्री 8 वाजता महेश व सहकाऱ्यांतर्फे (महाराष्ट्र) जागृती फोक व फ्युजन कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 12 रोजी संध्याकाळी 6 वाजता भजनाचा कार्यक्रम व रात्री 8 वाजता ‘ईश्वरशक्ती’ हा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
भजन व फुगडी स्पर्धेचे आयोजन
शुक्रवार दि. 13 रोजी संध्याकाळी 5 वाजता भजन स्पर्धा तर शनिवार दि. 14 रोजी संध्याकाळी 6 वाजता फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 15 रोजी संध्याकाळी 5 वाजता ‘सूर-ईश्वर’ हा विनय महाले व साथींचा अभंग, भक्ती, नाट्य व भावगीतांचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजता लोकनृत्य स्पर्धा होऊन जत्रोत्सवाची सांगता होईल. भजन, फुगडी व लोकनृत्य स्पर्धा नावनोंदणीसाठी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.