Shiroda News : शिरोड्यात समीकरणे बदलण्याचे संकेत; भाजपला ५ हजारांची आघाडी

Shiroda News : यंत्रणा नसूनही काँग्रेसला ७५३९ मते
bjp
bjp Dainik Gomantak

Shiroda News :

फोंडा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघातून भाजपला २८ ते ३०हजार मतांची आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ही आघाडी वीस हजार मतांपुरतीच सीमित राहिली.

एकंदर लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा विचार करता येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत.

शिरोडा मतदारसंघातून भाजपला ८ ते १०हजार मतांची आघाडी मिळेल, अशी ग्वाही शिरोड्याचे आमदार तथा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात भाजपला फक्त ५ हजार मतांची आघाडी मिळू शकली. कसलीही यंत्रणा नसतानाही कॉंग्रेसला ७५३९ मते प्राप्त झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे तुकाराम बोरकर यांना फक्त १९५३ मते प्राप्त झाली होती.

याचा अर्थ या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने तब्बल ५५०० मतांची झेप घेतलेली दिसत आहे. त्याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मगो’च्या संकेत मुळे यांना २३९७ मते प्राप्त झाली होती. यावेळी मगो-भाजपची युती असल्यामुळे ही मते भाजपच्या पारड्यात पडण्याची अपेक्षा होती.

पण युती असूनही भाजप अपेक्षेप्रमाणे मताधिक्य प्राप्त करू शकला नाही लोकसभा निवडणुकीत मंत्री जि.पं. सदस्य तसेच पंचायती, भाजप बरोबर असूनही भाजपला त्याचा विशेष फायदा झाल्याचे दिसले नाही. शिरोडा मतदारसंघात बोरी, शिरोडा, पंचवाडी, तसेच बेतोडा निरंकाल या चार ग्रामपंचायती येत असून यापैकी पंचवाडी पंचायत कक्षेतील अधिक मते कॉंग्रेसकडे वळल्याचे दिसून येते.

bjp
Goa Pollution Control Board: सांकवाळ-शिंदोळी नाला प्रदूषित; आंतोन वाझ यांच्याकडून पाहणी

या भागात कॅथलिकांचा जास्त भरणा असल्यामुळे त्यांनीच हा ‘करिष्मा’ केला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष शिरोडकर १७०० मतांनी निवडून आले होते. पण ‘आप’ व कॉंग्रेस यांची आघाडी कायम राहिल्यास मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यापुढे एक आव्हान उभे राहू शकते. महादेव नाईकांची भूमिका स्पष्ट झाली नसली तरी पुढच्या वेळी ते ‘इंडिया’चे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यास शिरोडा मतदारसंघातील राजकीय कंगोरे बदलू शकतात. असा होरा राजकीय विश्‍लेषक व्यक्त करत आहेत.

महादेव नाईक ठरले ‘ट्रम्प कार्ड’

या निवडणुकीत ‘ट्रम्प कार्ड’ ठरले ते माजी मंत्री महादेव नाईक. गेल्या विधानसभा निवडणुकीत महादेव नाईक हे ‘आप’तर्फे रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांना ६,१३३ मते प्राप्त झाली होती. यावेळी ते परत भाजपच्या छावणीत येणार, अशी वदंता होती. पण महादेवांनी ‘सायलंट मोड’ मध्ये राहण्याचे पसंत केल्‍याचे दिसून आले. त्यामुळे त्यांची ही मते कॉंग्रेसकडे वळली का, भाजपकडे हे कळायला मार्ग नसला तरी आकडेवारी पाहता त्यांची मते कॉंग्रेसकडे वळल्याची शक्यता अधिक वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com