
डिचोली/पणजी: श्री लईराई देवीच्या कौलोत्सवावेळी मंगळवारी (ता. ६) शेवटच्या दिवशी विशेष करून गावाबाहेरील भाविकांना शिरगावात पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय (रविवारी) झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला.
शिरगावात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिरगावात झालेल्या नवनियुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, देवस्थान आणि पंचायत समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तबही करण्यात आले.
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रविवारी संध्याकाळी गोमेकॉत जाऊन शिरगाव जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी त्यांनी एकूण १४ रुग्ण गोमेकॉत असल्याचे स्पष्ट करत त्यातील ४ रुग्ण अजूनही अत्यवस्थ असल्याचे सांगितले. श्री लईराई देवीची जत्रा झाल्यानंतर चार दिवस गावात कौलोत्सवाची धूम असते. चार दिवस गावातील घरोघरी देवीचा कळस नेण्यात येतो. त्याठिकाणी कौल घेण्यास भाविक गर्दी करतात.
शुक्रवारी उत्तररात्रीनंतर झालेल्या दुर्घटनेनंतर बाहेरील भाविक देवीचा कौल घेण्यासाठी शिरगावात येण्याचे टाळणार, असा एक समज होता. देवस्थान समितीनेही तसे आवाहन केले होते. मात्र, आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी कौल घेण्यासाठी गावाबाहेरील भाविकांची गर्दी झाली होती.
कौलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री देवीचा कळस मंदिरात प्रवेश करतो, त्यावेळी दरवर्षी शिरगावात भाविकांचा महापूर लोटतो. मात्र, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर देवस्थान समिती सतर्क झाली आहे. देवस्थान समितीच्या निर्णयाला आता प्रशासनाने मान्यता दिली आहे. शिरगाव गावाबाहेरील भाविकांना मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत शिरगावात प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. फक्त देवस्थान समिती आणि महाजनांना मोकळीक देण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिली.
गोमेकॉतील डॉक्टर या रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना हवी ती सर्व मदत आणि उपचार करणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविकांवर अत्यंत दक्षतेने उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना विशेष उपचारांची गरज आहे, त्यांच्यावर वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून आहे. म्हापसा उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी १८ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी १० जणांना प्रकृती सुधारल्यामुळे शनिवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्य सरकारने या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन्ही रुग्णालयांमधील उपचारांची तपासणी करत असून कोणत्याही रुग्णास वैद्यकीय उपचारांत कसूर होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे, असे मंत्री राणे म्हणाले.
शिरगाव जत्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी संदीप जॅकीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या चौकशी अहवालाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता, हा अहवाल उद्या (ता. ५) हाती येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालातून प्रत्यक्ष घटनास्थळी काय घडले, याचा उलगडा होऊ शकतो.
मृत भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. १२ दिवस झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे अर्थसाहाय्याचा धनादेश दिला जाईल. या दुर्घटनेत दगावलेल्या भाविकांप्रती आपण संवेदनशील असून सरकारतर्फे सर्व जखमींनाही पूर्ण सहकार्य पुरविले जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवावेळी शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीची धग आणि भयानकता अजूनही कायम आहे. मात्र, अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यापुढे स्टॉल उभारण्यावर कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. पुढील वर्षी जत्रोत्सवावेळी या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली.
पुढील वर्षापासून मुड्डी ते वडाचावाडा-शिरगाव येथील होमकुंड स्थळापर्यंत स्टॉल थाटण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय श्री लईराई देवस्थान समितीने घेतला आहे. शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली, ती जागा अरुंद असल्याने दरवर्षी गोंधळ उडतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.