
डिचोली: वयस्कर आईचा आशीर्वाद घेऊन व ‘मम्मी, मी येतो’ असे सांगून शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेला गेलेला माठवाडा-पिळगाव येथील धोंड भक्त सागर नंदुर्गे (वय ३० वर्षेे) हा युवक पुन्हा घरी परतलाच नाही. चेंगराचेंगरीत त्याच्यावर क्रूर काळाने झडप घातली.
सागर याच्यामागे वयोवृद्ध आई आणि एक बहीण (विवाहित) आहे. सागर हा एकुलता एक मुलगा आणि बहिणीचा लाडका भाऊ. शिरगाव येथील दुर्घटनेत सागरचा बळी गेल्याने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आता मला ‘मम्मी’ म्हणून कोण हाक मारणार, असा तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहे. या दुर्घटनेत माठवाडा-पिळगाव येथील पाच धोंड भक्तगण जखमी झाल्याचे सांगण्यात आलेे.
एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या सागरचे यंदा लग्न करण्याची तयारी सुरू होती. त्यापूर्वीच क्रूर काळाने त्याच्यावर झडप घातली. शवचिकित्सा करून मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केल्यानंतर स्थानिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात सागरच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सागर हा गेल्या वर्षी श्री लईराई देवीचा धोंड झाला. यंदा त्याचे दुसरे वर्ष होते. वाड्यावरील अन्य धोंड भक्तांसह तो तेथीलच तळीवर देवीचे कडक व्रत पाळत होता. वृद्ध आई आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन सागर हा काल (शुक्रवारी) सायंकाळी वाड्यावरील अन्य धोंड भक्तगणांसमवेत जत्रेला गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मामा होता. मात्र, सागर जत्रा आटोपून घरी परतलाच नाही. वृद्ध आईवर आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. शिरगाव येथील दुर्घटनेत सागरचा बळी गेल्याने संपूर्ण माठवाडा परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.