Seva Sankalp Campaign: महिनाभर 'सेवा संकल्प' अभियान; 17 सप्टेंबरपासून राज्यात सरकार राबविणार 12 उपक्रम

Goa Seva Sankalp Campaign 2026: महिनाभर चालणाऱ्या या व्यापक अभियानाचा आराखडा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
Goa Seva Sankalp Campaign 2026
Seva Sankalp CampaignDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा २५ वर्षांचा सार्वजनिक सेवेचा प्रवास अधोरेखित करण्यासाठी गोवा सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे.

महिनाभर चालणाऱ्या या व्यापक अभियानाचा आराखडा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित या पत्रकार परिषदेला मंत्री माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, रमेश तवडकर आणि आमदार दाजी साळकर उपस्थित होते.

Goa Seva Sankalp Campaign 2026
Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान करणे आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महिनाभरात १२ प्रमुख उपक्रम राबविले जाणार असून, प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींवरही त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

घराघरांत ‘आशीर्वाद का दिया’

१७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानात’ लाभार्थी कुटुंबांकडून घराघरांत दिवे लावून सरकारच्या सेवा व योजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ‘मेरे सपनों का भारत’ याविषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून विकसित भारताचे स्वप्न व विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती अधोरेखित केली जाईल.

पथनाट्य, संमेलनातून जनजागृती

‘सेवा स्मरण-नमो सेवा’ उपक्रमांतर्गत पथनाट्य, नाट्यप्रयोग आणि गणेश मंडळांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांची संमेलने घेण्यात येतील. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सरकारच्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

Goa Seva Sankalp Campaign 2026
Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

मतदारसंघात ‘सेवाज्योती यात्रा’

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘सेवाज्योती यात्रा’ किंवा ‘सेवाकलश यात्रा’ आयोजित केली जाणार आहे. याशिवाय गुजरातमधील वडनगर ते वाराणसी अशी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या उपक्रमांतून सेवा, विकास आणि स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम

‘सेवा सेतू-सरकार आपके द्वार’ या उपक्रमांतर्गत गोव्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध सरकारी योजना व सेवांचा थेट लाभ मिळवून देण्यात येईल. रांगोळी, वक्तृत्व स्पर्धांसारख्या उपक्रमांतून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे.

नवसंशोधनावर हॅकाथॉन

अभियानाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-तंत्रज्ञान आणि नवसंशोधनावर आधारित हॅकाथॉन तसेच ‘सर्व्हिस इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित केले जाणार आहे. नागरिक आणि तरुणांनी प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Goa Seva Sankalp Campaign 2026
Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

‘जनसेवा महाकुंभ’ने सांगता

‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता ‘जनसेवा महाकुंभ-सुशासन सेवा संवाद’ या कार्यक्रमाने केली जाणार आहे. यानिमित्त राज्यातील तीन जिल्ह्यांत विशेष परिषदा होतील. सेवा, सुशासन, विकास आणि जनसहभाग याविषयांवर संवाद साधत सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com