Amit Shah in Goa: अमित शहा यांच्या दौऱ्यातून लोकसभेच्या प्रचाराचा बिगुल

25 हजार कार्यकर्ते येणार : फर्मागुढीतील सभास्थळाची पाहणी
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah in Goa: राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून दक्षिण गोव्यातील जागेसाठी दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी गोव्यात येत आहेत.

फर्मागुढी येथे होणाऱ्या जाहीर सभेत ते राज्यातील लोकसभेच्या प्रचाराचा बिगुल वाजवतील. या सभेसाठी राज्यभरातून 25 हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे आज शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

या सभेच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस तथा एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यासह मुख्य कार्यकर्त्यांना घेऊन फर्मागुढी येथील सभास्थळाची पाहणी केली.

ही सभा यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकर्त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचे नियोजन स्पष्ट करून सभेसाठी सर्वतोपरी सज्ज होण्याचे निर्देश दिले.

लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही वेळ असला, तरी भाजपच्या वतीने सांसद प्रवास प्रचार मोहिमेअंतर्गत गृहमंत्री अमित शहा यांच्या देशभरात जाहीर सभा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फर्मागुढी येथे भव्य जाहीर सभा होत आहे.

फर्मागुढी येथे होणारी शहा यांची जाहीर सभा या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून कोणत्याही परिस्थितीत दोन्हीही जागा जिंकायच्याच, हे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

Goa
Goa Corona Update :राज्यातील विमानतळांवर कोरोना चाचणीची सुविधा; राज्यात गेल्या 24 तासात 99 नवे कोरोना रूग्ण

कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट

या जाहीर सभेसाठी सत्ताधारी पक्षाच्या सर्व 28 आमदारांना कार्यकर्ते जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रामुख्याने नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या आठ आमदारांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

या सभेत लोकसभेच्या दोन्ही जागांसह फोंडा आणि साखळी नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार करता येईल, याची काळजी घेण्यात येत आहे. या दोन मतदारसंघांतून जास्तीत जास्त कार्यकर्ते जमा होतील, याकडे लक्ष देण्यात येत आहे.

कार्यकर्ते सज्ज

सभा स्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही गोव्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा बहुमताने जिंकू.

या सभेसाठी राज्यभरातून 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी सोय करण्यात आली असून यासाठी मंत्री, आमदार, पदाधिकारी, पक्षाचे विविध मोर्चे, मतदारसंघाचे मंडळ अध्यक्ष, सचिव विविध शक्तिकेंद्रे यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. ते त्या व्यवस्थितपणे पार पाडतील.

Goa
Super Cup Football : एफसी गोवा निसटत्या फरकाने विजयी

‘म्हादईबाबत भूमिका स्पष्ट करा’

केंद्रीय मंत्री अमित शहा हे कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी म्हादई प्रश्‍न गोव्याच्या सहमतीने सोडवला असून उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे वक्तव्य केले होते. आता प्रत्यक्ष अमित शहा गोव्यात येत असल्याने त्यांनी म्हादईबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी ट्विट करत आता शहा यांनी म्हादईप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे संयुक्त संयोजक समील वळवईकर यांनीही भाजपवर टीका करत म्हादईबाबत जाब विचारला आहे.

याशिवाय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनीही अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

केंद्रीय नेते अमित शहा यांची फर्मागुढी येथे होणारी जाहीर सभा ही लोकसभेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून तिचा लाभ पालिका निवडणुकांसाठीही होईल. दोन्ही पालिकांमध्ये आमचे समर्थक उमेदवार बहुमताने निवडून येतील. या सभेसाठी राज्यभरातून 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते येतील, असा विश्‍वास आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com