
सावंतवाडी: येथील मोती तलावातील पाच फुटी मगर जेरबंद करण्यात आज सकाळी सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले. मोती तलावातील गणपती साण्याजवळ संगीत कारंज्याच्या ठिकाणी मगर वारंवार निदर्शनास येत होती. तब्बल पाच दिवस मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
येथील मोती तलावात वारंवार मगरीने दर्शन होत असल्याने सावंतवाडीकरांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. संगीत कारंजाच्या ठिकाणी मगर दिसून येत होती. ही मगर वन विभागाने जेरबंद करावी, अशी मागणी नागरिकांची होती. प्रयत्नसुद्धा वनविभागाकडून केले होते.
सुरुवातीला ज्या ठिकाणी मगर दिसून येत होती, त्या भागात वन विभागाने पिंजरा लावला होता; परंतु तब्बल पाच दिवस मगर हुलकावणी देत होती. गणेश विसर्जनाठिकाणीच मगर असल्याने रात्री विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनही भीती व्यक्त करण्यात येत होती.
नागरिक तसेच गणेश भक्तांच्या मागणीचा विचार करता आज पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाच्या पथकाने पुन्हा संगीत कारंजाच्या ठिकाणी सापळा रचला. त्यामध्ये ही मगर जेरबंद झाली. यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथकप्रमुख बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर आदी उपस्थित होते.
मगर मोहिमेचे नेतृत्व माजी वनसेवक बबन रेडकर यांनी केले. त्यांनी आपल्या सेवेत आणि नंतरही विविध रेस्क्यू मोहिमांमधून ३६४ मगरी, साप, बिबटे, अजगर, नाग अशा अनेक वन्यप्राण्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे त्यांची निवृत्तीनंतर जलद कृती दलप्रमुखपदी नियुक्ती झाली असून, पथकासह ते वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचे काम करत आहेत.
मगर साधारण पाच फुटांची आहे. मी, ही ३६४ वी मगर पकडली आहे. पाणी जास्त असल्याने आम्हाला अधिक वेळ द्यावा लागला; मात्र आज लावलेल्या सापळ्यात ती अडकली.
- बबन रेडकर, जलद कृती दलप्रमुख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.