

वाळपई: सत्तरीच्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास होत होता. याची दखल घेऊन ब्रह्माकरमळीत कदंब बससेवा सुरू केल्याबद्दल श्री ब्रह्मदेव देवस्थान समितीतर्फे मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री ब्रह्मदेव देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष सागर सखाराम देसाई, नगरगाव पंचायतीचे माजी सरपंच वामनराव देसाई, सचिव महेंद्र गाडगीळ, सागर प्रभुदेसाई, अरविंद देसाई, काशिनाथ गावडे, महादेव दळवी, साई देसाई, मयंक दळवी, जय सावंत, नीळकंठ देसाई, मल्हार देसाई व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी सरपंच वामनराव देसाई यांनी अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास येत असल्याबद्दल कदंब महामंडळाचे जाहीर आभार व्यक्त केले. ब्रह्मोत्सवाच्या व दत्तजयंतीच्या पूर्वी कदंब बससेवा सुरू झाल्याने भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बससेवा वाळपईहून सायं. ५ वा. सुरू होऊन शिगणे येथे पोहोचेल व त्यानंतर ५.३५ वा. शिगणे ते वाळपईला रवाना होईल. पुन्हा ६.३० वा. वाळपईवरून करंझोळ येथे रवाना होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना या कदंब बससेवेचा फायदा होईल.
कोरोना काळानंतर अनेक खासगी तसेच कदंब महामंडळाच्या बसेस बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत होते. शेवटी नागरिकांच्या या मागणीची दखल घेत वाळपई-शिंगणे-करंजोळ या मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त होत आहे.
वामनराव देसाई, नगरगाव पंचायतीचे माजी सरपंच
गावात वाहतुकीची सोय असणे अत्यंत गरजेचे आहे. गरीब नागरिक आणि विद्यार्थी हे अजूनही बसप्रवासावर अवलंबून आहेत. बस नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. पूर्वी आपली स्वतःची बस होती, त्यामुळे बस सेवेअभावी होणाऱ्या त्रासाचा आम्हाला अनुभव आहे. आता पुन्हा बससेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
कदंब महामंडळाच्या बसेस या मार्गावर धावत असल्या तरी त्यांचे वेळापत्रक अनियमित असते. वाळपईत प्रवासी कमी असले तर चालक पुढे जात नाहीत, ज्यामुळे एक-दोन प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दुसरी बस मिळेपर्यंत रात्रीपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची वेळ येते. त्यामुळे कदंबनेही ग्रामीण भागातील लोकांचा विचार करून सुरू केलेल्या फेऱ्या पूर्ण कराव्यात.
रामा चोर्लेकर, शेळप
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.