हरमल : कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक संस्था बंद होत्या. शिक्षण क्षेत्रातील मरगळ व विद्यार्थ्यांचे नुकसान पाहता पालकांना बरीच चिंता लागून राहिली होती. काही संस्था वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होत्या. हरमल पंचक्रोशी शिक्षण (Goa Education) संस्थेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गेल्या सहा महिन्यांत वर्ग सुरू करण्याचे धाडस दाखवले. पालकांनीही समाधान व्यक्त केले होते. आता अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याबाबत विद्यार्थी, प्राचार्य व चेअरमन यांच्याशी केलेली बातचीत.
चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर : हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय मिळून चार विभाग कार्यान्वित आहेत. येथे सुमारे 1800 विद्यार्थी शिक्षण घेतात. यंदा दहावीचे वर्ग नियमांचे पालन करून सुरू केले. दहावीच्या 80 विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या चार वर्गांत बसवतो. त्यासाठी पालकांनी हमीपत्र लिहून दिले आहे. गेल्या आठवड्यात नववीचे वर्ग चालू केले तर पुढील आठवड्यात आठवीचे वर्ग सुरू होतील. आता प्राथमिक ते सातवीपर्यंतच्या मुलांच्या पालकांचा आग्रह असून सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
प्राचार्य गोविंदराज देसाई : हरमल पंचक्रोशी शैक्षणिक संस्थेने नवीन इमारतीत वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांची दाटीवाटीने बसण्याची शक्यता कमी आहे. इमारत प्रशस्त असल्याने नियमांचे पालन करून प्रत्येक वर्गात निम्मे विद्यार्थी बसून अध्ययन करतात. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोरोना नियमावलीचे पालन करणे अनिवार्य केले आहे. एखाद्यास ताप, अंगदुखी, डोकेदुखी होत असल्यास त्याला रजा मंजूर केली जाते. अध्यापक मंडळींना दोन्ही डोस बंधनकारक आहे.
विद्यार्थी वर्गाचे मत
उत्कर्षा तळवणेकर (विद्यार्थी) : यंदा आम्ही अकरावीत प्रवेश घेतला आहे. ऑफलाईन वर्ग सुरू न होता ऑनलाईन परीक्षा सुरू असल्याने थोडीशी नाराजी आहे. अभ्यास करण्यास वेळच न मिळाल्याने धाकधूक वाढली आहे. घरी परतताना बसेस नसल्याने गैरसोय होते.
साईश नाईक (विद्यार्थी) : ऑफलाईन वर्ग सुरू झाल्याचा आनंद आहेच, मात्र थेट परीक्षा झाल्याने पूर्वतयारी करण्यास वेळ अपुरा पडला. घरी राहून कंटाळा आला होता. शिवाय मोबाईल रेंज नसणे, अन्य कटकटी तसेच डोळ्यांची स्थिती पाहता ऑफलाईन वर्ग सुरू होणे गरजेचे होते.
यदुवीर पेडणेकर (पालक) : मुले शाळांमध्ये जाऊ लागल्याने आता घरांतील किलबिलाट कमी झाला आहे. त्यांना शाळेतून घरी परतण्यासाठी बससेवा उपलब्ध करावी. सध्या त्यांची गैरसोय होत आहे. पालकांना शाळेपर्यंत खेपा माराव्या लागतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.