खरी कुजबुज: ‘गोवा वाले बीच पे...’

Khari Kujbuj Political Satire: वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विनाहेल्मेट चालकांना मोफत हेल्मेट देण्याचे जाहीर केले होते. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त त्यांनी चिखलीतून हेल्मेट वाटपास सुरवातही केली. ते महिला स्कूटरस्वारांना हेल्मेट देतानाची छायाचित्रेही समाज माध्यमांवर फिरू लागली.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

‘गोवा वाले बीच पे...’

सध्या गोव्यातील किनारी पर्यटनाचा विषय गाजतोय तो काही गुन्हेगारी घटनांमुळे. मात्र, हेच किनारे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. १ ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू झाला असून किनाऱ्यावरील हॉटेले भरू लागली आहेत. काही सेलिब्रिटीही गोव्यात दाखल होताना दिसताहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने आपला २७ वा वाढदिवस गोव्यातच साजरा केला.

गोव्याशिवाय दुसरे ठिकाण मी या सेलिब्रिटीसाठी निवडू शकत नाही, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे गोव्यातील किनारे तिला आकर्षित करतात. शांत किनाऱ्यावर लाटांसोबत खेळतानाचा व्हिडिओसुद्धा साराने समाज माध्यमावर शेअर केला आहे. तिने गोव्याच्या स्वच्छ किनाऱ्यांचे खास कौतुकही केले आहे.

हेल्मेट गेली कुठे?

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विनाहेल्मेट चालकांना मोफत हेल्मेट देण्याचे जाहीर केले होते. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त त्यांनी चिखलीतून हेल्मेट वाटपास सुरवातही केली. ते महिला स्कूटरस्वारांना हेल्मेट देतानाची छायाचित्रेही समाज माध्यमांवर फिरू लागली. मंत्र्यांनीच हेल्मेट देण्याचे जाहीर केल्याने अनेकांनी विना हेल्मेट प्रवास केला, तर नवीन हेल्मेट मिळेल असा सोयीस्कर हिशेब केला. त्याआधी पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पुष्प देऊन गांधीगिरी केली होती.

त्यानंतर अचानक कारवाई सुरू केल्याने तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करून घेण्याची वेळ विना हेल्मेटधारी वाहनचालकांवर आली आहे. यामुळे वाहतूकमंत्र्यांनी फसवणूक केल्याची त्यांची भावना झाली आहे. वाहतूकमंत्र्यांनी पुरेशी हेल्मेट आणली होती, तर ती गेली कुठे? हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. मोफत हेल्मेटचा लाभ केवळ चिखलीवासीयांसाठीच अशी खिल्ली यानिमित्ताने उडवली जात आहे.

मोरपिर्लातील बाबूंचे यश

हरवळे पंचायतीसाठी झालेल्‍या निवडणुकीत भाजपने सर्वच्‍या सर्व जागा जिंकून ‘क्‍लीन स्‍वीप’ मारलेली असतानाच तिथे केपे मतदारसंघातील मोरपिर्ला पंचायतीत माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांनी पाठिंबा दिलेल्‍या सोनू भिवा वेळीप यांनी तब्‍बल ९३ मतांच्‍या आघाडीने आपल्‍या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत प्रभाग ६ मधील पोटनिवडणूक जिंकली.

ही पोटनिवडणूक बाबू कवळेकर आणि केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता या दोघांसाठीही प्रतिष्‍ठेची होती. मात्र, त्‍यात बाबूंच्‍या उमेदवाराने बाजी मारली. मागच्‍या निवडणुकीतही या प्रभागातून बाबूंचाच उमेदवार जिंकून आला होता, पण त्‍यावेळी मतांची आघाडी फक्‍त ९ होती. मात्र, यावेळी ही आघाडी ९३ पर्यंत पोचल्‍याने बाबूंची केपे मतदारसंघावर अजूनही पकड आहे हे त्‍यातून दिसून आलेच.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

मडगाव पालिका इमारतीचा उद्धार होणार?

मडगावची पालिका इमारत ही खरी तर वारसामूल्‍य असलेली इमारत. या इमारतीला पूर्वी लाल रंग होता आणि हा लाल रंग या इमारतीची ओळख बनला होता. मात्र, कालांतराने मडगाव पालिकेवर इतिहासाची जाणीव न ठेवणारे नगरसेवक निवडून आल्‍यानंतर जे काय होणार होते ते झालेच. कुणाच्‍या तरी डोक्‍यातून एक सुपीक कल्‍पना बाहेर आल्‍याने या लाल रंगाच्‍या इमारतीच्‍या अंगावर पिवळा रंग चढला आणि या इमारतीचे जुने वैभव नष्‍ट झाल्‍यासारखे वाटले.

आता या इमारतीचा सर्व रंग फिका झालेला आहे आणि लवकरच या इमारतीची रंगरंगोटी होणार आहे. यावेळी नगरसेवकांनी केलेल्‍या मागणीवरून या इमारतीला पुन्‍हा पूर्वीचा लाल रंग चढविण्‍याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला आहे. मडगावच्‍या या वारसामूल्‍य इमारतीचे संवर्धन करण्‍याच्‍या दृष्‍टीने टाकलेले हे पहिले पाऊल म्‍हणायचे का?

कळंगुटमधील शांतता

पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी कळंगुट पोलिस ठाण्याचे प्रमुख म्हणून परतताच पोलिसी खाक्या दाखवणे सुरू केले आहे. आमदार मायकल लोबो यांनी नाईक यांची राखीव पोलिस दलात बदली झाल्यावर जाहीरपणे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर नाईक हेच कळंगुटमध्ये परत येणार हे स्पष्ट झाले होते. तसेच झाले आणि बदली रद्द होऊन ते परत आले आहेत. आल्या आल्या त्यांनी कळंगुट बागा परिसरात व्यक्तिशः गस्त घालणे सुरू केले आहे.

हिंसाचार आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्याने बदलीची वेळ आपल्यावर आली होती हे ते विसरलेले नाहीत. त्यामुळे १० च्या ठोक्याला संगीत बंद करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी कळंगुटच्या निशाकालीन जीवनाला शिस्त लावली तर बरेच गैरप्रकार रोखले जाऊ शकतील असे बोलले जात आहे. त्यांच्या कारवाईमुळे कोणता राजकीय गट सुखावणार व कोणता राजकीय गट दुखावणार यावर बरेच काही अवलंबून असल्याचे सांगण्यात येते. तूर्त तरी परेश नाईक हे स्थिती नियंत्रणात आणण्यात गुंतले असून सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे चित्र आहे.

नावाचीच ‘पनिशमेंट’?

गेल्या आठवड्यात उत्तरेतील एका किनारी भागात काही हिंसक घटनांची योग्य पद्धतीने हाताळणी करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत, बदली केलेल्या संबंधित पोलिस निरीक्षकाची पुन्हा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकपदी अल्पवधीतच नियुक्ती करण्यात आली आहे. वरील प्रकरणांमध्ये कथित कसर ठेवल्याने निरीक्षकांना काही वेळ बदलीचा सामना करावा लागला होता. याला पोलिसी भाषेत ‘पनिशमेंट’ म्हटले जाते! मात्र, हा काळ साहेबांसाठी खूप कमी होता.

साहेबांची बदली झाल्यानंतर लगेच स्थानिक आमदार यांच्यापासून सरपंचांनी ही बदली अयोग्य असल्याचे म्हटले होते. काहीही असले तरी साहेबांनी कळंगुटमधील आपली नाळ घट्ट केली आहे हे यातून स्पष्ट होते. तसेच पुन्हा स्थानकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर साहेब रात्रीच्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कडक बंदोबस्त व गस्त घालताना दिसत आहेत. सध्या रात्रीच्यावेळी किनारी भागात पोलिसांची उपस्थिती बऱ्यापैकी दिसत आहे. हा ट्रेंड कायमस्वरूपी टिकावा, अशी लोकांची इच्छा आहे.

नोकऱ्यांचे आमिष आणि फसवणूक

सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. या नोकऱ्या उमेदवाराच्या कामगिरी तसेच गुणवत्तेनुसार दिल्या जातात असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी त्यावर जनतेचा विश्‍वास बसणार नाही हे सत्य आहे. यापूर्वी विविध खात्यामध्ये नोकऱ्यांसाठी झालेले घोटाळे व त्यामुळे रद्द करण्यात आलेली नोकरभरती हे काही नवे नसून ते सर्वश्रुत आहे. जर सचिवालयात कामाला असलेल्या महिलेने सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून फसवल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे, तर या प्रकरणात आणखी काहीजण सामील असू शकतात.

कारण एक सरकारी कर्मचारी महिला एवढे मोठे धाडस करील असे वाटत नाही. पोलिस तिच्या चौकशीतून कुठपर्यंत पोचतात याकडे जनतेचे लक्ष आहे. तिचा या प्रकरणामुळे कोणा वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारण्याशीही संपर्क असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चौकशीतून ठोस पुढे काही येईल की ही महिला फसवणुकीचा कथित आरोप फेटाळून लावील यावरच पोलिसांचे तपासकाम ठरणार आहे. सरकारी नोकऱ्यांचे पदानुसार दर ठरत असतात. मात्र, त्याचा शोध कधीही घेण्यात आलेला नाही.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

ड्युटीच्या नावाने पोलिसांचा छळ?

राज्यातील एका पोलिस स्थानकात सध्या पोलिस कर्मचाऱ्यांचा एका पोलिस कॉन्स्टेबलने ड्युटी मास्तरच्या (साहाय्यक उपनिरीक्षक) मदतीने छळ चालवला आहे. वरिष्ठ अधिकारी या कॉन्स्टेबलच्या हाताखालचे बाहुले बनले असून २४ तास सेवा बजावलेल्या (चिरीमिरी देणाऱ्यांना वगळून) पोलिसांना पुन्हा रिझर्व्ह ड्युटीवर घातले जाते. आपण पोलिस निरीक्षकांना आणले आहे असे हा कॉन्स्टेबल जाहीरपणे सांगू लागला आहे आणि वरिष्ठ तसेच ड्युटी मास्तरच्या आडून त्याने पोलिसांचेच खच्चीकरण चालवले आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या इतरत्र बदलीसाठी प्रयत्न चालवले आहेत. आम्हा पोलिसांचाच जर छळ चालवला गेला, तर सर्वसामान्य जनतेला न्याय तरी कसा मिळेल? असा सवाल आता पोलिसच आपापसात करू लागले आहेत. राज्यातील अनेक पोलिस स्थानकांत ड्युटी मास्तरच्या मदतीने असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे गृह खाते याकडे लक्ष देईल का? कारण सध्या ड्युटी मास्तर हे आपल्याला आलेल्या ‘जीपे’वरून कर्मचाऱ्यांचा ड्युटी चार्ट बनवत आहेत. त्यामुळे काम करणारे काम करताहेत अन् इतर सुगीचे दिवस जगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com