Sanquelim Municipal Council Election 2023 : ‘साखळी’च्या निकालाने टीकाकारांची तोंडे बंद; मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची मेहनत फळाला

पालिकेवर भाजप पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
Sanquelim-Ponda Municipal Council Election
Sanquelim-Ponda Municipal Council ElectionDainik Gomantak

विलास ओहाळ

मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांत भाजपला साखळी नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवता आला नाही. साखळी मतदारसंघाचा आमदार भाजपचा राहिला तरी पालिका मात्र काँग्रेसकडेच राहिली होती, ही बाब अनेकवेळा भाजपला सलत राहिली. त्याची सर्वात जास्त टोचणी झाली ती प्रमोद सावंत यांना.

कारण आमदार असतानाही त्यांना भाजपचा झेंडा नगरपालिकेवर फडकवता येत नव्हता. यंदा भाजपने १२ पैकी ११ जागा जिंकत निर्विवादपणे नगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे. त्यामुळे यापूर्वी निश्‍चितच आमदार असूनही सावंत यांना साखळी पालिका जिंकता येत नाही, असे म्हणणाऱ्या टीकाकारांची तोंडे त्यांनी नक्कीच बंद केली.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत साखळी शहराने प्रमोद सावंत यांना म्हणावी तेवढी साथ दिली नाही. ग्रामीण भागात त्यांना पडलेल्या आणि टपाल मतांमुळे ते जिंकून आले. तरीही मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच पुन्हा निवड झाल्याने ती बाब साखळीतील भाजपला बळ देणारी ठरली.

Sanquelim-Ponda Municipal Council Election
Pink Auto in Ponda : फोंड्यात प्रथमच धावली ‘पिंक ई रिक्षा; ‘रोटरी क्लब’चा उपक्रम

साखळी नगरपालिका यावेळी भाजप जिंकू शकत नाही, असे चित्र निवडणुकीपूर्वी तयार झाले होते. काँग्रेसचे येथील नेते धर्मेश सगलानी आणि प्रवीण ब्लेगन यांच्याच खांद्यावर नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी राहिली.

भाजपने या निवडणुकीत बेरजेचे राजकारण केले. त्यात त्यांनी काँग्रेसच्या गोटात असलेल्या रियाझ खान आणि यशवंत माडकर अशा मातब्बर उमेदवारांना आपल्याकडे वळविले. भाजपात ते आल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्‍चित झाली होती. त्याशिवाय काही ठिकाणी उमेदवारी देताना भाजपला टोकाचे निर्णयही घ्यावे लागले.

भाजपच्या नगरसेविका शुभदा सावईकर यांना डावलून सिद्धी परब यांना उमेदवारी दिली. त्यावेळी एकप्रकारे भाजपने येथे चाचपणीच करण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्ट दिसत होते. याशिवाय त्यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांनीही जोर लावला होता. परंतु याठिकाणी ‘टुगेदर फॉर साखळी’ या विरोधी गटाला उमेदवार शोधावा लागला.

अखेर राजकारणापासून दूर असलेल्या माजी नगरसेविका सुनीता वेरेकर यांना उमेदवारी द्यावी लागली. परब या भाजपमध्ये असल्याने त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरले.

भाजपची आक्रमक व्यूहरचना

भाजपने नगरपालिका ताब्यात घेण्याच्याच दृष्टीने सुरुवातीपासून व्यूहरचना आखली होती. प्रचाराच्यावेळी आणि अंतिम टप्प्यावेळी आक्रमकपणे डावपेच आखले, त्याचा फायदा पक्षाला नक्कीच झाला. प्रभागनिहाय एक निरीक्षक नेमत पक्षाने त्या-त्या ठिकाणी ‘वॉच’ ठेवला. त्यामुळे विरोधी उमेदवारांनाही प्रचार करताना सावध पावले टाकावी लागली होती.

काँग्रेस नेत्यांची प्रचाराकडे पाठ

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय ‘टुगेदर फॉर साखळी’ नावाने पॅनल उभे केले. परंतु या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे आमदार फिरले नाहीत की कोणी मोठे नेते फिरले. प्रदेश महिला काँग्रेसच्या बिना नाईक व इतर काही पदाधिकारी काही उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते. काँग्रेसने सर्व जबाबदारी धर्मेश सगलानी व प्रवीण ब्लेकन यांच्याकडे देऊन किनारा केला होता.

काँग्रेसची गणिते फसली

ही नगरपालिका जिंकायचीच असा पण केला असता, तर तीन आमदार, गोवा प्रभारी यांना तळ ठोकावा लागला असता. मात्र, काँग्रेस नेत्यांनी विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शहरातून मिळालेल्या मतांची संख्या पाहता गणिते रचली असणार असेच दिसते. स्थानिक पातळीवरचे मुद्दे वेगळे, विधानसभेसाठी मुद्दे वेगळे असतात, हे काँग्रेस नेत्यांनी ओळखायला हवे होते.

भाजपकडून प्रभावशाली यंत्रणेचा वापर

या सर्व मतांचा फरक किंवा आकडेवारीवर नजर टाकली तरी भाजपला वाढलेल्या अडीच टक्के मतांनीच साथ दिली असे दिसते. या निवडणुकीत भाजपने जी यंत्रणा वापरली ती अत्यंत प्रभावशाली ठरली, असे म्हणता येईल. चाणक्य नीती वापरत भाजपने या निवडणुकीत डावपेच खेळल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक प्रभागनिहाय निरीक्षक नेमण्याचा हा पहिलाच प्रयोग साखळीत यशस्वी झाला.

प्रचाराबाबत सतर्कता

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सुलक्षणा सावंत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. कर्नाटक निवडणुकीतील प्रचार सांभाळत सुलक्षणा सावंत यांनी साखळीतील पालिका निवडणुकीवर लक्ष ठेवले होते. प्रत्येक घटनेची माहिती त्यांना कर्नाटकात प्रचारावेळी मिळत होती, त्यामुळे त्यांना आक्रमक प्रचार करता आला.

११ सत्ताधारी नगरसेवक

साखळीत विकासासाठी पक्षांतर केलेले नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. आता साखळीत ११ नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे झाले असले तरी एका विरोधी मताचाही आदर सत्ताधारी पक्षाला करावा लागणार आहे. पुढील पाच वर्षांत साखळीचा किती विकास झाला आणि किती कायापालट झाला हे साखळीकरांना दिसून येईलच.

निकाल काय सांगतो?

 1. प्रभाग १ मध्ये यशवंत माडकर यांच्यासमोर त्यांच्या काकी उभ्या ठाकल्या होत्या. कुंदा माडकर यांनी १६४ मते घेतली, तर यशवंत यांना २५३ आणि संतोष हरवळकर यांना २०९ मते पडली. माडकरांना काकी उभ्या राहिल्या नसत्या १६४ मते आपल्याकडे वळली असती, असे वाटते.

 2. महिला राखीव असलेल्या प्रभाग २ मध्ये धर्मेश सगलानी यांनी पत्नी ईशा सगलानी यांना उमेदवारी दिली; परंतु तेथे भाजपने निकिता नाईक यांना उमेदवारी दिली. नाईक यांनी ३९५ मते मिळविली आणि सगलानी (२१५) यांचा ८० मतांनी पराभव केला. याठिकाणी तीन अपक्ष उमेदवार काहीही प्रभाव पाडू शकले नाहीत.

 3. प्रभाग ३ मध्येही सिद्धी परब आणि सुनीता वेरेकर यांची सरळ लढत होती. परब यांनी ३३४ मते मिळवीत वेरेकर (२३८) यांचा ९६ मतांनी पराभव केला.

 4. प्रभाग ४ मध्ये तिहेरी लढत होती. परंतु खरी लढत ही धर्मेश सगलानी आणि रेश्‍मा देसाई यांच्यातच झाली. विजयी झालेल्या देसाई यांनी ३६२ मते मिळविली, तर सगलानींना ३३४ मते मिळाली. अपक्ष उमेदवार १२ मते मिळवू शकला.

 5. प्रभाग ६ मध्ये भाजपच्या विनंती पार्सेकर यांच्याविरोधात तीन उमेदवार होते, तरीही त्यांनी ४२२ मते मिळविली. पार्सेकर यांनी २१० मतांनी सर्वात मोठा विजय मिळविला आहे.

 6. प्रभाग ७ मध्ये मात्र चार उमेदवार होते, तरीही ब्रह्मानंद देसाई हे १३९ मते मिळवीत निवडून आले.

 7. भाजपने प्रभाग ८ मध्ये रियाझ खान यांना बिनविरोध निवडून आणले. रियाझ खान यांचे प्रभाग आठमध्ये प्राबल्य आहे.

 8. प्रभाग ९ मध्ये आनंद काणेकर यांच्यावर भाजपने विश्‍वास ठेवला. या प्रभागातही ‘टुगेदर''ला उमेदवार मिळाला नाही, त्यामुळेच प्रवीण ब्लेगन यांना आपली मुलगी भाग्यश्रीला उमेदवारी द्यावी लागली. ब्लेगन यांच्या मुलीने २५२ मते घेतली, तर विजेत्या काणेकर यांना ३४५ मते मिळाली आहेत.

 9. ओबीसी राखीव प्रभाग १० मध्ये दयानंद बोर्येकर विरुद्ध राजेंद्र आमशेकर अशीच लढत झाली. बोर्येकर यांनी ३६५ मते घेत आमशेकर (१६९) यांना १९६ मतांनी मात दिली.

 10. ओबीसी महिला राखीव प्रभाग ११ मध्ये दीपा घाडी (३५१) यांनी रश्‍मी घाडी (२३४) यांचा पराभव केला.

 11. महिला राखीव प्रभाग १२ मध्ये अंजना कामत यांनी ३९९ मते मिळवीत बाजी मारली. या प्रभागात तिहेरी लढत होती. परंतु त्यांच्या विरोधात दोन्ही उमेदवारांना २१७ मते मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com