Sanquelim: साखळीतील मुख्य रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा! पालकांचा जीव टांगणीला; विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवताना होतेय कसरत
साखळी: शहरातील एकमेव आणि अरूंद रस्त्यावरून दररोज सकाळी मुलांना हायस्कूलमध्ये पोहोचविणे आणि दुपारी आणणे पालकांसाठी जीवघेणी कसरत बनली आहे. शहरातील या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
साखळी हे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील पालकही साखळीतील शाळा-हायस्कूलमध्ये मुलांना भरती करतात. शहरातील बहुतांश शाळा या मुख्य रस्त्यालगतच असून मुलांचा वावर असल्याने अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याप्रकरणी साखळी पालिका, डिचोली वाहतूक पोलिस विभाग आणि डिचोली आरटीओ यांनी संयुक्तपणे उपाययोजना आखावी आणि पालकांना दररोज करावी लागणारी कसरत थांबवावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळी आणि दुपारी कारापूर तिस्क ते साखळी इस्पितळापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी शाळा भरताना आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने शहराबाहेरच अडवून ठेवून रस्ता इतर वाहनांसाठी खुला ठेवावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
बगल मार्गाची व्यवस्था नाही
शहराला बगल मार्गाची व्यवस्था नाही. त्यामुळे कारापूर तिस्क ते साखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रापर्यंत एकाच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने धावतात. एखाद्या ठिकाणी चारचाकी उभी केली तरी वाहतूक कोंडी होते. या एकमेव रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. सकाळी शाळा सुरू होताना आणि दुपारी सुटण्याच्या वेळी अवजड वाहनांमुळे शहरातील रस्त्यावर ताण येतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.