Sanquelim Crime News Bicholim Police cracked murder case in 6 hours
विनायक सामंत , डिचोली
साखळी : साखळीमधील विठ्ठलापूर येथील अल्पवयीन मुलाच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या सहा तासात छडा लावला. साखळी पोलिसांनी आरोपीला महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली असून चंदू अंबादास पाटील (वय ३०) असे या आरोपीचे नाव आहे.
विठ्ठलापूर येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलाचा रविवारी पहाटे खून करण्यात आला. समीर अली असे या मयत मुलाचे नाव होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत डिचोली (Bicholim) पोलिसांनी दोन तपास पथके तयार केली. यात PSI सुनील पाटील, PC लक्ष्मण नाईक, PC प्रशांत गावकर, PSI विराज धौसकर, HC नीलेश फुगेरी आणि मयूर असोलकर यांचा समावेश होता. प्राथमिक चौकशीतून पोलिसांना संशयिताबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर तांत्रिक निगराणीद्वारे पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली. आरोपी महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचला असता पोलिसांनी त्याला अटक केली.
समीर अली हा दोन दिवसांपूर्वीच गोव्यात भावासोबत आला होता. समीरला आईवडिल नसून तो भावासोबतच डेअरीत होता. विठ्ठलापूर येथील उर्दू माध्यमात तो प्रवेशही घेणर होता. मात्र, त्यापूर्वीच समीरची हत्या झाली.
हत्येचे कारण काय?
समीरचा सख्खा भाऊ हा डेअरीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो काम सोडून गावी परतला होता. डेअरी मालकाने त्याच्या जागी चंदू पाटीलला कामावर ठेवले होते. मात्र, चंदूची अरेरावी सहन न झाल्याने डेअरी मालकाने समीरच्या भावाला कामावर परत यायला सांगितले. तो येताना समीरलाही घेऊन आला होता. कामावरून काढून टाकल्याने चंदू संतापला होता. यातूनच त्याने समीरची हत्या केली. रविवारी पहाटे तिघे कामगार डेअरीच्या एका खोलीत झोपले होते. यादरम्यान पाटीलने ११ वर्षीय मुलाला उचलून बाहेर नेले व त्याच्या डोक्यावर दगड घालून त्याची हत्या केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.