

मडगाव: सांगे आणि केपे हे दोन्ही मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव ठेवल्यास सध्याचे सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरू असतानाच फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघातील काकोडा येथील मारुतीगड संस्थानाला भेट दिल्याने कुडचडे मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. फळदेसाई कुडचडेत आल्यास भाजपचे विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांचे काय होणार, असा प्रश्न त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
यासंदर्भात फळदेसाई यांना विचारले असता, मी मारुतीगड संस्थानाला अनेकवेळा भेट देतो. तशाच प्रकारची आजची ही भेट होती. त्यामागे काहीच राजकारण नव्हते. मात्र, काल मी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी काही उत्स्फूर्तपणे बोललो ते या भेटीला जोडून त्याचे राजकारण केले जात आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावर काब्राल म्हणाले, की ‘कुडचडेतून कुणाला उमेदवारी द्यावी, याचा निर्णय मी नव्हे तर भाजप संघटना घेणार आहे. निवडणुकीला अद्याप सहा महिने बाकी आहेत.’ तुम्ही कुणासाठी तुमची जागा सोडणार का असे त्यांना विचारले असता, यापूर्वी पक्षाने आदेश दिल्यानंतर मी कित्येकवेळा माझी पदे सोडली आहेत. पण आता तशी स्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी कुणासाठी जागा सोडू, असा सवाल त्यांनी केला.
फळदेसाई हे कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त दैनिक ‘गोमन्तक’ने आज प्रसिद्ध केले आहे. काल त्यांना एका वृत्तवाहिनीने सांगे मतदारसंघ राखीव झाल्यास कुठून निवडणूक लढविणार असे विचारले असता, जर सांगे नसेल तर माझी पहिली पसंती केपे मतदारसंघ असेल. पण केपेही राखीव झाल्यास मला जवळचा मतदारसंघ कुडचडे आहे. मी तिथून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करेन. याबद्दल मी डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशीही बोललो आहे, असे ते म्हणाले होते.
समाजमाध्यमांवरून ही इच्छा प्रकट करताना कुडचडेवासीयांचा आशीर्वादही त्यांनी मागितला होता. या संदेशात त्यांनी सांगे मतदारसंघ राखीव झाला तर परिस्थिती बदलणार असून या परिस्थितीमध्ये मी आता जे नेहमीच माझी ताकद आणि प्रेरणा राहिली आहे, त्या लोकांमध्ये वळू पाहात आहे. कुडचडेची जनता माझ्यासाठी
नेहमीच ताकद आणि प्रेरणा राहिली आहे. माझा जन्म कुडचडेत झाला. त्यामुळे मला हे हक्काचे ठिकाण वाटते. त्यामुळेच तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला पाहिजे. मी सांगेची जशी सेवा केली, त्याच भावनेने कुडचडेचीही सेवा करू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.
नीलेश काब्राल यापूर्वी तीनवेळा कुडचडेतून जिंकून आले असून चौथ्यांदाही त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळेल, याची मला खात्री आहे. यदाकदाचित कुठल्याही कारणास्तव पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्यास मी या उमेदवारीवर दावा करेन.
- सिद्धार्थ गावस देसाई, अध्यक्ष, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत.
सांगे आणि केपे हे दोन्ही मतदारसंघ राखीव झाल्यास कुडचडे हा माझ्यासाठी जवळचा मतदारसंघ आहे. माझा जन्म या गावात झाला असून शिक्षणही याच मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात माझे अनेक हितचिंतक आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून मी निवडणूक लढविणे शक्य आहे का, याचा अंदाज घ्यायचे ठरविले आहे. मला कुडचडे मतदारसंघातून उमेदवारी द्यावी की नाही, याचा निर्णय शेवटी भाजप पक्ष घेईल.
- सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री.
कुडचडेतील तिकिटाचा निर्णय पक्ष घेईल. निवडणुकीला सहा महिने बाकी आहेत. तोपर्यंत काय होणार हे आताच सांगणे कठीण. अनेक नेत्यांचे डोळे कुडचडे मतदारसंघावर असू शकतात. कारण मी या मतदारसंघातील बहुतांश विकासकामे पूर्ण केली आहेत. नवीन जो कोण येणार त्याला आणखी काही करावे लागणार नाही, असे त्यांना वाटत असावे.
- नीलेश काब्राल, आमदार, कुडचडे.
कुडचडे मतदारसंघातील उमेदवारीबाबत अजिबात वाद नाही. जर वाद असेलच तर फळदेसाई यांच्याशी चर्चा करून तो प्रश्न सोडविला जाईल. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल आहेत. जर त्यांच्या मतदारसंघात दुसरा कोणी लुडबूड करत असेल तर ते अयोग्य असून भाजप शिस्तबद्ध पक्ष ते खपवून घेणार नाही.
- दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.
पूर्वी रोहन, आता सुभाष
नीलेश काब्राल हे तीनवेळा भाजपच्या उमेदवारीवर कुडचडेतून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्यासमाेर भाजपचेच कार्यकर्ते असलेले रोहन गावस देसाई यांनी आव्हान उभे करत कुडचडे मतदारसंघात आपले कार्यही सुरू केले आहे. त्यामुळे कुडचडे भाजपमध्ये काब्राल आणि देसाई असे दोन गट पडले होते. अशातच आता सुभाष फळदेसाई यांनीही कुडचडेतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.