CM Pramod Sawant : भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा खून, त्या पाठोपाठ कुडचडे येथे रेती कामगारांवर झालेला गोळीबार आणि हत्या या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आपल्या शासकीय निवासस्थानावर राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून झाडाझडती केली.
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाळू उपसा कायदेशीर करणार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच कामगाराचा मृत्यू झाला असून दोषींवर कडक कारवाई करणार, असे ते म्हणाले.
बैठकीला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, दोन्हीही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, खाण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत रेती आणि चिरे व्यवसायाचे कायदेशीर सुलभीकरण, अमली पदार्थ विरोधी पथक बळकट करणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात सुरू असलेल्या अवैध रेती आणि चिरे खाणीसंदर्भात लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि हा व्यवसाय तातडीने कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील. कुडचडे येथे झालेली दुर्घटना गंभीर असून रेती कामगाराचा झालेला मृत्यू हे पोलिसांच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.’
कुडचडे येथील मांड बायसन येथील गोळीबार प्रकरणात पोलिसांना अद्यापही कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. मात्र, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
रेती व्यवसायावर न्यायालयीन बंधने
रेती आणि चिरे उत्खनन व्यवसायावर न्यायालयीन प्रक्रियेमुळे विविध बंधने आहेत. हा व्यवसाय कायदेशीररित्या सुरू करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. रेती व चिरे उत्खनन कायदेशीर, सुलभरीत्या पण मर्यादित स्वरूपात करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या बैठकीनंतर सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.