Goa Crime: एका क्षणाचा राग अन् संसाराची राखरांगोळी! नवऱ्याशी भांडण होताच बायकोनं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं हादरलं सांकवाळ
सांकवाळ: क्षुल्लक कारणावरून पतीशी झालेल्या वादानंतर एका २७ वर्षीय विवाहितेने बेडरूममध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सांकवाळ येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, केवळ एका क्षणाच्या रागामुळे एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मूळचे ओडिशा राज्यातील आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते गोव्यात स्थायिक झाले होते आणि सांकवाळ येथील एका भाड्याच्या खोलीत राहत होते. २३ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास जेवण झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये स्वयंपाकघरात बोलता-बोलता क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पत्नी रागाच्या भरात स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि थेट बेडरूममध्ये गेली.
पतीने मदतीसाठी फोडला टाहो
बेडरूममध्ये शिरताच पत्नीने आतून दरवाजा कडी लावून बंद केला. रागाच्या भरात असलेल्या तिने छताच्या पंख्याला आपल्या दुपट्ट्याने गळफास लावून घेतला. दरम्यान, दरवाजा बंद झाल्याचे पाहून पतीने तो उघडण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने पतीने तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले.
शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखून बेडरूमचा दरवाजा तोडला. आत प्रवेश केल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तातडीने खाली उतरवून उपचारांसाठी प्रथम कासावली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तिथे पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणी वेर्णा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के. फर्नांडिस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक तपासात घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचे समोर आले असले, तरी पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. केवळ एका क्षणाच्या रागावर ताबा न राहिल्याने एका तरुण महिलेने आपले आयुष्य संपवले, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

