

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केलेल्या हिंदुत्ववादी गौतम खट्टरला आयोजक असलेल्या सनातन धर्म रक्षा समितीने भाषणासाठी सहा मुद्दे दिले होते. परंतु, त्याने या सर्व मुद्यांकडे दुर्लक्ष करीत स्वत:चेच हिंदुत्वाबाबतचे विचार मांडल्याचा दावा आता आयोजकांनी केला आहे. या प्रकरणानंतर यापुढे अशा कार्यक्रमांत भाषणांचे कार्यक्रमच रद्द करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. त्यामुळे या वादानंतर आता आयोजकांनी आपले हात वर केल्याचे दिसून येत आहे.
‘‘गौतम खट्टरला याआधी आम्ही कधी ओळखत नव्हतो. त्यामुळे जयंती कार्यक्रमात त्याने काय बोलावे? यासंदर्भातील सहा मुद्दे आम्ही त्याला दिलेले होते. परंतु, त्याने आम्ही दिलेल्या एकाही मुद्द्यावर भाष्य केले नाही. स्वत:ला वाटेल तसा तो बोलत राहिला.
त्यामुळे त्या क्षणी आम्हालाही काही बोलता आले नाही. खट्टर याने त्या भाषणात जी वक्तव्ये केली, त्यावरून आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. यापुढे अशा वक्त्यांना बोलवून त्यांच्या भाषणांऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील’’, असे सनातन धर्म रक्षा समितीचे अध्यक्ष संजय कोरगावकर यांनी शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, परशुराम जयंतीनिमित्त गत शनिवारी वास्कोत आयोजित कार्यक्रमात बोलताना गौतम खट्टर याने ‘गोंयचो सायब’ म्हणून जगभर ख्याती असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळले.
शिवाय, समाजातील सर्वच स्तरांतून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर खट्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी त्याला हिमाचल प्रदेशमध्ये अटक केली असून, रविवारपर्यंत त्याला गोव्यात आणले जाणार आहे.
खट्टरने गोशाळेसाठी मागितली होती देणगी
‘‘परशुराम जयंतीनिमित्त वास्कोत आयोजित कार्यक्रमासंदर्भात जी बैठक झालेली होती, त्यात पाच वक्त्यांच्या नावांवर चर्चा झालेली होती. त्यातून गौतम खट्टर याला आणण्याचे निश्चित झाले. विमानाने तिकीटे, निवास–भोजनाचा खर्च आयोजकांनी करण्याचे ठरले होते.
खट्टर याने या कार्यक्रमासाठी कोणतेही मानधन मागितलेले नव्हते. परंतु, आपल्या गोशाळेसाठी देणगी देण्याची विनंती त्याने आमच्याकडे केलेली होती. त्यासाठी आम्ही होकारही दिलेला होता. परंतु, त्यानंतर ते शक्य झाले नाही’’, असे संजय कोरगावकर यांनी सांगितले.
‘गोव्यात आणण्यामागे कारस्थान होते का?
गौतम खट्टरला केलेली अटक काही प्रमाणात दिलासा देणारी गोष्ट असली तरी त्याला गोव्यात बोलावून घेण्यामागे काही कारस्थान होते का? या दृष्टीने आता पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी या आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे. गौतम खट्टर याला गोव्यात कुणी बोलावून घेतले. त्यामागचे नेमके कारण काय होते? त्याला गोव्यात बोलावून घेण्यामागे काही कारस्थान तर लपलेले नाही ना या सर्वाचा तपास झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
खट्टर याने जे वक्तव्य केले आहे ते गंभीर स्वरूपाचे असून लोकांच्या धार्मिक भावना दुखल्या गेल्या आहेत. यामुळे गौतम खट्टर याच्या विरोधात जास्तीत जास्त कडक कलमे लावून त्याला कोणत्याही प्रकारे जामीन मिळणार नाही याची तजवीज सरकारने करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.