

म्हापसा/पणजी: सॅम्युअल ब्रागांझा (२२) या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. संशयाची सुई म्हापसा पोलिसांकडे वळली असतानाच, आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, अत्यंत शोकाकूल अवस्थेत सोमवारी सॅम्युअलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावसावाडो-म्हापसा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सॅम्युअलच्या आईने पोलिसांवर आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली होती. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, उत्तर गोवा पोलिस
अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी तपासाची जबाबदारी पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याकडे सोपविली आहे. त्यानुसार त्यांनी म्हापसा पोलिसांची चौकशी सुरू केली आहे.
पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी सोमवारी स्वतः म्हापसा पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर तेथील काही पोलिस अधिकाऱ्यांनी पर्वरी येथील अधीक्षक कार्यालयात हजर राहून आपली बाजू मांडल्याचे समजते. घटनेच्या दिवशीचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज, नोंदी आणि संबंधित कागदपत्रे तपासासाठी मागविण्यात आली आहेत. त्यामुळे म्हापसा पोलिस स्थानकातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.
सॅम्युअलने रस्त्याच्या बाजूला कचरा टाकल्याच्या वादावरून तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे झालेली बदनामी, त्यानंतर दाखल झालेला गुन्हा आणि चौकशीदरम्यान झालेला मानसिक तणाव यामुळे सॅम्युअलने गेल्या गुरुवारी मध्यरात्री टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीच्या नावाखाली युवकावर मानसिक दबाव आणला गेला का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, एका साध्या प्रकरणात युवकाला तब्बल सात तास पोलिस ठाण्यात का ठेवण्यात आले, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलेल्या कुटुंबीयांनी अखेर सोमवारी सॅम्युअलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
रविवारी म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चपासून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मेणबत्ती फेरी काढण्यात आली होती. सॅम्युअलच्या मृत्यूमागील सत्य काय, याचे उत्तर आता पोलिस चौकशी, सीसीटीव्ही फुटेज आणि न्यायवैद्यकीय अहवालातूनच समोर येणार आहे. या प्रकरणातील निष्कर्षांकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.
सीबीआय चौकशी करा : काँग्रेस : सॅम्युअल ब्रागांझा याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सॅम्युअलच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयास्पद स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष व सर्वंकष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीची मागणी
तपासाच्या केंद्रस्थानी सीसीटीव्ही फुटेज
घटनेच्या दिवशीचे सर्व फुटेज मागविले
त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता
काही अनुत्तरित प्रश्न
सॅम्युअलने आत्महत्या करण्याइतका टोकाचा निर्णय का घेतला?
व्हायरल झालेला व्हिडिओ हा केवळ निमित्त होता की ट्रिगर?
चौकशीसाठी पोलिस ठाण्यात गेलेला युवक काही तासांतच आत्महत्या करतो, हा केवळ योगायोग मानायचा का?
जर हा सरळ आत्महत्येचा प्रकार असेल, तर मृतदेहावर मुका माराच्या खुणा कशा आढळल्या?
चेहऱ्यावर आढळलेल्या जखमा नेमक्या कधी आणि कुठे झाल्या?
आत्महत्येपूर्वीच्या शेवटच्या काही तासांत सॅम्युअल कोणकोणाला भेटला होता?
पोलिस ठाण्यात असताना त्याच्याशी नेमके काय घडले?
पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण सत्य सांगू शकेल का?
जर सीसीटीव्ही फुटेज आहे, तर ते तपासासाठी तात्काळ जप्त करण्यात आले आहे का?
शरीरावरील जखमा आणि आत्महत्या यांचा काही संबंध आहे का?
सॅम्युअल रात्री १० वाजता म्हापसा पोलिस स्थानकातून घरी गेल्यानंतर पुढील अडीच तासांत नेमके काय घडले?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.