खरी कुजबुज: वरातीमागून घोडे

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई यांनी आपले ‘संडे डायलॉग’ चतुर्थीनंतर पूर्ववत सुरू होणार असल्याचे जाहीर केले
Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई यांनी आपले ‘संडे डायलॉग’ चतुर्थीनंतर पूर्ववत सुरू होणार असल्याचे जाहीर केले
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

वरातीमागून घोडे

साळगाव येथे उच्च दाबाचे वीज उपकेंद्र बांधले जात आहे. किनारी भागाची वीज समस्या दूर करण्यासाठी या उपकेंद्राच्या उभारणीकडे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या उपकेंद्राच्या पाहणीसाठी येणार म्हणून लोबो यांनी या उपकेंद्राच्या कामाची अलीकडे पाहणीही केली आहे. या उपकेंद्राकडे उच्च दाबाच्या वीजवाहिन्या आणण्यासाठी कोमुनिदादच्या जमिनीची गरज भासणार आहे असे आता लक्षात येत आहे. यामुळे वीज उपकेंद्र तयार होत असताना उच्च दाबाच्या वीजवाहिन्या घालण्यासाठी मनोरे उभे करण्यासाठी जमीन मागण्याची वेळ सरकारवर येणार आहे. वरातीमागून घोडे ही म्हण सरकारी कारभाराला कशी चपखल बसते याचे हे उदाहरण ठरावे.∙∙∙

असेही ‘पनवती’ मंत्री...

पावसाळी अधिवेशन आटोपल्यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाईल असे भाकीत अनेक माध्यमांनी वर्तविले आहे. भाजपाच्या सुकाणू समितीलाही - ज्यात पक्षाचे एकनिष्ठ सदस्य आहेत, बदल व्हावासा वाटतो. सध्या मुख्यमंत्र्यांविरुद्धही कारस्थाने सुरू आहेत. शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे धाक व शिस्त निर्माण व्हावी यासाठीही बदल अपेक्षीत आहे, परंतु पक्षश्रेष्ठींची संमती घेतल्याशिवाय काहीही बदल केला जाऊ शत नाही. महत्त्वाचे म्हणजे पक्षश्रेष्ठींना वेळ नाही. गोवा त्यांच्यासाठी महत्त्वाचे राज्य नाही. गोव्यात पक्षाचे २८ सदस्य पाच जणांचा पाठिंबा यामुळे ३३ सदस्यांचे गोवा सरकार अत्यंत बळकट असल्याचा त्यांनी समज करून घेतला आहे. या काळात काही मंत्री - त्यात एक असाही मंत्री आहे - ज्याच्या विरोधात विरोधकांनी सतत रान उठवले व ज्यांच्यामुळे सरकारही बदनाम झाले - जो स्वतःला भाजपाचाही मानत नाही - त्यालाही अजून मंत्रिमंडळातून डच्चू देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे ते उन्मत्त बनले आहेत... त्यामुळे मंत्रिमंडळाची पुनर्रचना होऊन या ‘पनवती’ कधी जातील याची उत्कंठा लोकांनाही लागून राहिली आहे.∙∙∙

कडक भूमिकेची अपेक्षा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनानंतर आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी डोंगरकापणीविरोधात तलाठ्यांना जबाबदार धरले. एका कार्यालयावरही धडक भेट दिली. कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी दिली, परंतु या त्यांच्या मोहिमेत सातत्य राहणार का? असा प्रश्न पक्षाचे कार्यकर्ते विचारतात. विधानसभेत स्वपक्षाच्या सदस्यांमध्ये समन्वय नव्हता व स्वपक्षाची प्रतिमा उंचावण्याच्या प्रवृत्तीचाही अभाव दिसला, याची खंत नेत्यांमध्ये आहे. सदस्य सभागृहात कसून कामकाजात भाग घेत नसत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ‘सौम्य’ म्हणून प्रतिमा लोकांसमोर गेली. त्यांनी अत्यंत ताठर व कडक बनावे अशी मागणी पक्षाच्या सुकाणू समितीच्या सदस्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा सुधारण्यासाठी कडक भूमिका घेऊन आमदारांनाही जरब बसवावी अशी कार्यकर्त्यांची धारणा बनली आहे.∙∙∙

विद्यार्थी बनले प्रेक्षक!

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन विरोधी सदस्यांमुळे गाजले अशी चर्चा सुरू आहे, परंतु गोवा विधानसभेत पर्रीकर, जल्मी वगैरे विरोधी नेते होते, त्यापूर्वी सिकेरा, बाबू नायक विरोधी बाकांवर असत - तेव्हा विधानसभा लखलखती तलवार बनत असे. लोकांनाही प्रचंड उत्सुकता असे. लोक विधानसभा अधिवेशनाला हजर राहण्यासाठी गर्दी करत, परंतु सध्या प्रेक्षक गॅलरी रिकामी राहते. लोकांना त्याच त्या चर्चेमध्ये व विरोधकांच्या फार्समध्ये गंमत राहिलेली नाही. काही निरीक्षक सांगतात, की मनोहर पर्रीकर नेतेपदी असताना प्रेक्षक गॅलरीत बसायला जागा मिळत नसे व प्रश्नोतरीच्या तासानंतर प्रेक्षकांना बाहेर काढून इतरांना प्रवेश दिला जात असे. आता प्रेक्षागृह रिकामे राहते व ते अगदीच उघडे पडू नये म्हणून मोफत बसेस पाठवून विद्यार्थ्यांना आणून बसवले जाते. विधानसभेचा दर्जा घसरला, याचे हे चिन्ह नव्हे काय?∙∙∙

चर्चिल आलेमाव यांचे पुस्तक

आपले राजकीय जीवन म्हणजे खुले पुस्तक असे प्रत्येकवेळी म्हणणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपण आपले आत्मचरित्र लिहिणार असे जाहीर करून वर्ष उलटले तरी ‘आज येतोलें, फाल्या येतोलें’ या उक्तीप्रमाणे अजून काही हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही. एरव्ही मागचे वर्षभर चर्चिल राजकीयदृष्ट्या कुठेच नसल्याने आत्तापर्यंत त्यांना आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण करता आले असते, पण ते दोतोरांची तोखणाय करण्यात मग्न असल्याने त्यांना कदाचित त्यासाठी वेळ मिळाला नसेल. पण आता रोमीसाठी आंदोलन सुरू झाल्याच्या मुहूर्तावर त्यांनी पुन्हा एकदा हे आत्मचरित्र लिहिण्याचे ऐलान केले आहे. त्यात म्हणे ते अनेकांची भांडाफोड करणार आहेत. रोमीप्रेमी चर्चिलचे हे आत्मचरित्र रोमी कोकणीत लिहिणार की इंग्लिश भाषेत? ∙∙∙

कुडचडेतील राजकारण

विजय सरदेसाई यांनी आपले ‘संडे डायलॉग’ चतुर्थीनंतर पूर्ववत सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी रविवारी ते कुडचडे येथे जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत. त्यांना कुडचडे येथे सर्वप्रथम जावेसे का वाटले? विधानसभा अधिवेशन सरदेसाई यांनी गाजविले, परंतु कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी त्यांना अडथळा आणला. ते वेळ पाळत नाहीत असा त्यांचा आक्षेप होता व दोघांमध्ये खडाजंगीही उडाली होती. त्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी कुडचडेत जाऊनच काब्राल यांना आवाहन देण्याचा विचार सरदेसाई यांनी केला आहे. गंमत म्हणजे सरदेसाई कुडचडेत येऊन काब्राल यांना जाब विचारणार याचा काँग्रेसला आनंद व्हायला हवा होता, परंतु तेथील काँग्रेसचे नेते मोरेंत रिबेलो भलतेच अस्वस्थ बनलेत. कुडचडेत येताना सरदेसाई यांनी अमित पाटकरांना विश्वासात घेतले आहे काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यातून विरोधकांची प्रवृत्ती व स्वार्थच उघड झाला ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई यांनी आपले ‘संडे डायलॉग’ चतुर्थीनंतर पूर्ववत सुरू होणार असल्याचे जाहीर केले
खरी कुजबुज: विधानसभेतील महिला आमदार

अकादमीचे कार्य काय?

गोव्यात अनेक अकादमी आहेत. कोकणी, मराठी व हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारी अनुदानावर चालणाऱ्या अकादमीचे कार्य, मर्यादा व जबाबदारी काय? असा प्रश्न आता बुद्धिजीवींबरोबरच आम जनतेलाही पडणे स्वाभाविक आहे. सरकारी अनुदानावर चालणाऱ्या अकादमींनी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी तसेच साहित्यिक संशोधन व साहित्य रचनेबरोबरच साहित्यप्रेमींसाठी संमेलन आयोजित करण्याचे गरजेचे आहे. मात्र, या अकादमी आपले काम सोडून पुस्तक प्रकाशन सोहळे व बक्षीस वितरण सोहळे आयोजित करण्यात धन्यता मानतात. जे काम स्थानिक संस्थांचे ते काम अकादमीने का करावे? सरकारी निधीचा खर्च कुठे होतो? की सरकार अनुदानच देत नाही? हे प्रश्न आम्ही नव्हे जनता विचारीत आहे∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई यांनी आपले ‘संडे डायलॉग’ चतुर्थीनंतर पूर्ववत सुरू होणार असल्याचे जाहीर केले
खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना प्रेमाचे भरते?

दिगंबरांना दिसली अल्पसंख्याकांची ताकद

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने मडगावात त्यांची किती ताकद आहे हे दिगंबर कामत यांनी दाखवून दिली आहे. गेली तीस वर्षे मुस्लिम बांधव त्यांच्या सोबत आहेत. मात्र, या निवडणुकीत मोतीडोंगर, आझादनगरी, फकीरबांद तसेच मडगावमधील परिसरातील मुस्लिम समाजाने काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना मतदान केले हे स्वतः मडगाव मुसलमान असोसिएशनचे अध्यक्ष कादर शाह यांनीच सांगितले. दिगंबर यांनी आमचे प्रश्र्न सोडविण्याचे आश्र्वासन देऊनही ते पाळले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दिगंबरनासुद्धा आता हे कळून चुकले आहे म्हणूनच की काय ते सध्या या बाबतीत थोडे अलिप्त राहण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना अशी चर्चा मडगावात सुरू झाली आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com