

सांगे: संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिलेले साळावली धरण अखेर आज गुरुवारी (३० जुलै) सायंकाळी साडेतीनच्या सुमारास ४१ मीटर पातळी गाठत ओसंडून वाहू लागले. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे धरण भरण्यास तब्बल ३५ दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून धरण कधी भरते, याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांची उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे.
जलसंधारण खात्याचे अभियंता स्वप्निल दिवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगे येथे आत्तापर्यंत १८५१ मि.मी., तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नेत्रावळी येथे १८७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी साळावली धरण २५ जून रोजी भरले होते, तर दोन वर्षांपूर्वी ७ जुलैला जलाशय ओसंडला होता. यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. मात्र आता जलाशय दुथडी भरून वाहू लागल्याने पर्यटकांसाठी निसर्गरम्य देखावा खुला झाला आहे.
गेल्या महिनाभरात अनेक पर्यटकांनी धरणाला भेट दिली होती. आता जलप्रवाह सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत हजारो पर्यटक धरण परिसरात गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. धरणाकडे कुडचडे-दांडो-कोठार्ली मार्गे तसेच सांगे-पाजीमळमार्गे जाता येते. दोन्ही प्रवेशद्वारांवर ओळखपत्र दाखवून प्रवेश पास घेणे आवश्यक आहे.
जलसंपदा खात्याने पर्यटकांना सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे, धरण परिसरात कोणतीही धोकादायक कृत्ये किंवा गैरवर्तन न करता सुरक्षितपणे निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
‘गावणे’ही भरले
गेल्या काही दिवसांत राज्यातील धरणक्षेत्रांत सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे साळावलीनंतर गावणे धरणही भरले आहे. तिळारी, पंचवाडी धरण भागांतही पाऊस कायम असल्याने ही धरणेही लवकरच ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे.
धरणांतील जलसाठा
(टक्क्यांत)
धरण पाणीसाठा
साळावली १००
गावणे १००
पंचवाडी ९०
तिळारी ८४
आमठाणे ८१
चापोली ६४
अंजुणे ५७
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.