
साळ: राज्यात अनेक प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद होत असताना पुनर्वसन, साळ येथील सरकारी प्राथमिक शाळा मात्र आपल्या गुणवत्तेमुळे दरवर्षी पटसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सध्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ७५ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. ही शाळा पाच वर्षांपासून पक्क्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.
सध्या या शाळा इमारतीची स्थिती बिकट आहे. शाळा सध्या खासगी भाड्याच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली असून तिथे वर्गात जागा अपुरी आहे. तसेच खेळण्यासाठी मैदान आणि मूलभूत सुविधाही अपुऱ्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार या इमारतीसाठी दरमहा रु. ३०,०००- ३५,००० इतके भाडे दिले जाते. एवढे भाडे दिले जात असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा दोन्ही धोक्यात असल्याचे पालकांचे मत आहे. गेली पाच वर्षे या शाळेत दुकान वजा गाळे बांधलेल्या जागेत मुले दाटीवाटीने बसतात.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने जुन्या इमारतीविषयी दिलेल्या संरचनात्मक तपासणी अहवालात ती धोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते. २०२३ मध्ये शासनाने जुनी इमारत पाडून नवीन उभारण्यास मान्यता दिली, याला तीन वर्षे लोटली. त्यापूर्वी शाळा स्थलांतर होऊन दोन वर्षे म्हणजे पाच वर्षांचा कालावधी प्राथमिक विद्यार्थ्यांचा लोटला.
शिक्षण संचालनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्य वास्तुविशारद यांच्यातील पत्रव्यवहार, रेखाचित्रे, झोनिंग प्रमाणपत्रे, सर्वेक्षण आदी सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असूनही प्रत्यक्ष इमारत पाडून बांधकाम करणे हे काम अद्याप सुरूच झाले नाही.
फक्त कागदोपत्री कामं झाली की समाधान मानायचे का? आमच्या मुलांचे शिक्षण आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
शासनाने कृतीतून उत्तर द्यावे, असे शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघटनेचे म्हणणे आहे. भागशिक्षण अधिकारी कार्यालय व शिक्षण संचालनालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष पावले उचलण्यात आलेली नाहीत, यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करीत आहेत.
शाळा ही केवळ शिकवायची जागा नव्हे, तर सुरक्षित, प्रेरणादायक आणि सुविधायुक्त असावी लागते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तातडीने नवीन इमारतीचे काम सुरू करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शिक्षण देण्याचे वातावरण निर्माण करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी उच्चस्तरीय पाठपुरावा करावा, अशी पालकांची मागणी आहे.
तांत्रिकदृष्ट्या अपुऱ्या सोयी असूनही, शाळेच्या महती, कुशल शिक्षकवर्ग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम, कौशल्यपूर्ण शिक्षण यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. आज या शाळेला मिळालेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ आणि ‘महाराष्ट्राचा ऊर्जा पुरस्कार’ हे पुरस्कार ग्रामीण शाळेच्या शैक्षणिक उत्कर्षाची साक्ष देतात. प्रत्येक वर्षी प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवून शाळेचे नाव प्रकाश झोतात येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.