

सासष्टी: साळ नदीत सातत्याने होत असलेल्या प्रदूषणाला खारेबांद आणि साळ नदी परिसरातील बेकायदेशीर घरे तसेच त्या भागातील वाढती लोकसंख्या कारणीभूत असल्याचा आरोप केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केला आहे. या बेकायदेशीर घरांवर मडगाव नगरपालिका कोणतीही कारवाई करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
आरोग्य खात्याने सादर केलेल्या अहवालात बेकायदेशीर घरांमधून सोडले जाणारे सांडपाणी साळ नदीच्या प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घरांना सिवरेज वाहिन्यांची जोडणी नसल्याने सांडपाणी थेट नदीच्या पात्रात सोडले जात असल्याचे वाझ यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नावेली, कोंब, एसजीपीडीए मार्केट आणि फातोर्डा येथूनही सांडपाणी थेट साळ नदीत सोडले जात असल्याचा आरोप वाझ यांनी केला. साळ नदी सासष्टीसाठी महत्त्वाची असून ती केळशी गावातून वाहत अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे वाझ यांनी स्पष्ट केले.
अहवाल सादर करणार
नदीच्या पात्रात काळ्या पाण्याचा थर दिसून येत असल्याने दोन दिवसांपूर्वी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्यांची तपासणी करून त्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.