
भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू, असे सध्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना आणखी पाच वर्षे ही खासदारकी आहे. त्यामुळे त्यांना अन्य कोणतेही पद पक्षाने दिले नाही तरी ते खासदार म्हणूनही वावरू शकतात. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार यामुळे दिल्ली दरबारी तानावडे यांचे वजन अलीकडे वाढले होते हे कोणीही नाकारणार नाही. प्रदेशाध्यक्षपदी ते नसले तरी त्यांची पक्ष संघटनेवरील पकड लगेच कमी होईल, असे नाही. मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते असतील. नव्या प्रदेशाध्यक्षाला त्यांच्या सावलीत काही काळ तरी वावरावे लागेल. पक्ष कार्यासाठी माजी खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची पक्ष आठवण काढतो, तशी तानावडे यांची काढली जाईल. आता त्यांना पर्यटन भवनात असलेल्या आपल्या कार्यालयात बसण्यास वेळही मिळेल. ∙∙∙
राजधानी पणजीतील प्रत्येक पथावर, वीज खांबावर इंटरनेटचे केवल जाळे अडकलेले दिसते. या केबलमुळे पदपथावरून चालणे कठीण झाले होते. अनेकांचे पाय यात गुरफटायचे, पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवायच्या. अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या या केबल आज वीज खात्याकडून कापण्यात आल्या. परंतु एकही व्यक्ती या आपल्या केबल आहेत, म्हणून समोर आला नाही. जर समोर आला असता तर त्यावर कारवाई करण्यात आली असती. एकाअर्थी केबलच्या जाळ्यात गुरफटलेल्या पणजीला आता मुक्ती मिळणार असल्याने वीज खात्याने केबलवाल्यांना दिलेला हा ‘शॉक’ असून कारवाईचे कौतुक केले जात आहे. ∙∙∙
प्रभाकर गावकर आणि कृष्णा वेळीप हे दोघे केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष हाेण्याच्या शर्यतीत असताना कृपेश वेळीप यांच्या गळ्यात ही अध्यक्षपदाची माळ पडल्याबद्दल यापूर्वी कित्येकजणांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या संदर्भात सखोल चौकशी केली असता, कृपेश यांची वयोमर्यादा यासाठी कामी आल्याची माहिती प्राप्त झाली. यावेळी भाजपने मंडळ अध्यक्ष नेमण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे ठेवली होती. असे सांगण्यात येते की, केपे मंडळातून प्रभाकर गावकर, दयेश नाईक आणि कृपेश वेळीप ही तीन नावे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गेली होती. पण गावकर व दयेश नाईक यांचे वय ४५ पेक्षा जास्त असल्याने शेवटी कृपेश यांना लाॅटरी फुटली. त्यातल्या त्यात प्रभाकर गावकर यांना दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपद दिल्यामुळे काही प्रमाणात त्यांना शांत केले, असे म्हणावे लागेल. ∙∙∙
पणजी महापालिकेने म्हणे यंदा जानेवारीतच मॅान्सून तयारी सुरु केली आहे. गोव्यात मॉन्सून मे महिन्यातच सुरू होतो. यासाठी खबरदारी व पणजीवासीयांची अशा प्रकारच्या पावसामुळे गैरसोय होऊ नये हा त्या मागील हेतू असल्याचे सांगितले जात आहे. पण महापालिकेच्या या तयारीमागील प्रामाणिक हेतू बद्दल पणजीवासीय मात्र संशय घेताना दिसत आहेत. मॅान्सून तयारी म्हणजे गटार व नाले उपसणी हीच प्रामुख्याने कामे असतात. पण सध्या शहरात जी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत ती पूर्ण होण्याची मुदत ३१ मार्च असल्याचे सरकार सांगते मग प्रश्न असा पडतो की, महापालिका नेमकी कामे कुठे हाती घेणार, कारण महापालिकेने गटार व नाल्यांचा उपसा केला व नंतर स्मार्ट सिटीवाल्यांनी तेथे खोदकाम करून नाले वा गटारे बुजवून टाकली तर महापालिकेने केलेल्या कामाचा उपयोग तो काय की त्यासाठी पुन्हा कामगार जुंपायचे, अशी विचारणा होऊ लागली आहे. शेवटी अशी कामे म्हणजे ठेकेदारांची चंगळ हे मात्र खरे,असे म्हटले जाते. ∙∙∙
राज्यात सध्या वीज खात्याच्या कारवाईची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पाटो, पणजी येथे विजेच्या खांबांवर लटकणाऱ्या फायबर केबल्स तोडल्यामुळे इंटरनेट सेवा खंडित झाली, आणि यामुळे नागरिक व व्यावसायिकांत नाराजीचे सूर उमटले आहेत. वीज विभागाने दिलेल्या नोटीशीनंतरही केबल पुरवठादारांनी भूमिगत केबलिंगसाठी पावले उचलली नाहीत, म्हणून ही कारवाई करण्यात आली. अशा मोहिमा आता राबवल्या जातील, अशी घोषणा विभागाकडून करण्यात आली आहे. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यभर ही मोहीम राबवली जाईल, असा विभागाचा मानस असल्याने आता आमची इंटरनेट आणि केबल सेवा तर बंद होणार नाही ना अशी चर्चा गावागावात सुरू झाली आहे. ∙∙∙
कदंब महामंडळाने प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने स्मार्ट ट्रान्झिट कार्ड योजना लागू केली. प्रवाशांना स्मार्ट कार्डमुळे स्मार्ट सुविधा मिळाल्याचा आनंद होता. मात्र, तो काही काळच टिकला, असे कदंबने नवे स्मार्ट कार्ड लागू केल्यानंतर आढळून आले. दीडशे रुपयांचे कार्ड घेतलेल्या प्रवाशांना निम्मे पैसे परत मिळणार होते. ते काही लोकांनाच मिळाले. आता नवे पांढऱ्या रंगाचे स्मार्ट कार्ड घेतलेल्यांनाच सुविधा मिळेल, असे सांगितले जात असल्याने आधी ट्रान्झिट कार्ड घेतलेल्या प्रवाशांना प्रश्न पडला आहे, आम्ही कार्ड घेऊन आम्हाला काय फायदा? ∙∙∙
पणजीत शहरात इतरत्र गांजाचे रोप आढळले असते तर नक्कीच त्याचा कोणीतरी शोध घेत आहे, असे म्हटले असते. परंतु शनिवारी ज्या भागात आणि अडगळीत कुंडीत सुमारे तीन-साडेतीन फुटाचे गांजाचे रोप लागवडीप्रमाणे उगवल्याचे आढळल्याने खरोखरच याविषयी नागरिकच अधिक जागृत झालेत असे म्हणावे लागेल. ४, ६ आणि ११ जानेवारी अशा तीन तारखेला गांजाची रोपे पणजी शहर परिसरात आढळली. परंतु सुरुवातीला एक दिवसाआड दोन रोपे आढळली होती त्यावरून नेटकऱ्यांनी जेवढी नको त्यापेक्षाही अधिक टीका करण्याची संधी सोडली नाही. स्मार्ट सिटीला गांजा सिटी म्हणून हिनवण्यात नेटकरी कमी पडले नाहीत. गांजाचे कुंडीतच रोप आढळल्याने ते जाणूनबुजून लावले होते की काय, असा प्रश्न आता पडला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य काय ते पुढे येणार की नाही, हे पहावे लागणार आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.