Goa Politics: खरी कुजबुज: पुन्हा तानावडेच?

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आपल्या भाषणातही कोणत्याही विषयात फार खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मात्र, त्या - त्या कार्यक्रमातील विषयानुसार समोरच्यांवर किंवा श्रोत्यांवर आपली छाप पाडण्यात ते यशस्वी होतात.
Goa Politics
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पुन्हा तानावडेच?

भाजप प्रदेशाध्यक्षपदाबाबत अनेकजणांची नावे शर्यतीत आहेत, परंतु आता पक्षांतर्गत अनेकांना विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे भाजप प्रदेशाध्यक्ष झालेले अनेकांना पाहायचे आहे. त्यांना अध्यक्षांमध्ये बदल नकोय, परंतु काहींना आता प्रदेशाध्यक्ष बदलावा असेही वाटत आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत दोन गट तयार झालेले आहेत आणि ते साहजिकच आहे, परंतु नेमका प्रदेशाध्यक्षाच्या पटलावरचा राजा कोण ठरतो याकडे आता भाजप कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्ष तसेच जनतेचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे वाक्चातुर्य

सतत भाषणबाजी केल्यानंतर बोलण्यात वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो. कोणत्याही व्यासपीठावर गेल्यावर त्या विषयाच्या खोलीत न जाता तात्त्विक बाबींवर बोट ठेवत समोरच्यांना म्हणणे पटवून देणारे वक्ते आपण पाहत आलो आहोत. समाज माध्यमांत अशा वक्त्यांची वाहवा होत असते. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आपल्या भाषणातही कोणत्याही विषयात फार खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मात्र, त्या - त्या कार्यक्रमातील विषयानुसार समोरच्यांवर किंवा श्रोत्यांवर आपली छाप पाडण्यात ते यशस्वी होतात. एलआयसीच्या मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित महिलांना हसत खेळत टोमणेही मारले आणि भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना महिलांसाठी किती फायदेशीर आहेत, हेही पटवून दिले. एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच महिलांना न्याय देण्यात यशस्वी झाल्याचे वारंवार बिंबवण्याचे काम पद्धतशीरपणे त्यांनी केले आहे. त्यांच्यात आलेल्या वाक्चातुर्याची ही झलकच म्हणावी. ∙∙∙

‘स्‍टारबग कॉफी’ आणि बाबूश

पणजी भाजप मंडळाचे मावळते अध्‍यक्ष संजीव देसाई यांनी पणजीचे आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांची स्‍तुती करणारा एक व्‍हिडिओ सध्‍या भलताच व्‍हायरल झाला आहे. गोव्‍यातील चाळीसही आमदारांत जर दिलदार हृदयाचा कोण असेल तर ते बाबूश असा टॅगही संजीवने बाबूशना लावला आहे. यामुळे मुख्‍यमंत्र्यांसह इतर ३९ आमदार दिलदार काळजाचे नाहीत का? असा कुणालाही प्रश्न पडावा. ‍यावेळी त्‍यांनी बाबूश यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या ‘स्‍टारबग कॉफी’चाही उल्‍लेख केला. संजीवचा हे भाषण करताना कदाचित ऊर भरून आला असावा. जुन्‍या काळच्‍या भाजप कार्यकर्त्यांना कुणाकडून बटाटवडा आणि चहा मिळाला तरी त्‍यांना धन्‍य वाटायचे. आता भाजप कार्यकर्त्यांना ‘स्‍टारबगची कॉफी’ मिळत आहे. त्‍यामुळे बाबुश दिलदार काळजाचे वाटल्‍यास त्‍यात नवल ते काय? ∙∙∙

गोव्यात ‘आप’ला काँग्रेसशिवाय पर्याय नाही

दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत. गोव्यात काँग्रेस व आप हे आघाडीची भाषा करत आहेत. मात्र, दिल्लीत त्यांची बिघाडी आहे. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी ‘इंडी’ आघाडी करून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यातही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा स्वार्थ दिसून येतो. गोव्यात आम आदमी पक्ष आगामी विधानसभेसाठी आघाडीची भाषा करत असताना दिल्लीत मात्र त्याउलट भूमिका आहे. दोनवेळा ‘आप’ला निर्विवाद यश मिळाल्यानंतर हॅट्ट्रिक साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, हे शक्य होईल की नाही हे त्यांनी दिल्लीत गेल्या दशकात केलेल्या विकासकामांवरून दिसणार आहे. केजरीवाल सरकारला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबाबत विश्‍वास आहे तो गोव्यात नाही. गोव्यात ‘आप’चा दबदबा म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा आधार घेण्यापासून पर्याय नाही. गोव्यात त्यांचे दोन आमदार असले तरी गड जिंकण्यासाठी विरोधी पक्षांबरोबर हातमिळवणी केल्यासच शक्य आहे. ∙∙∙

एलआयसीने महिलांना का हेरले?

केंद्र सरकारने एलआयसीच्या माध्यमातून देशभरात ‘बिमा सखी योजना’ सुरू केली आहे. गोव्यातही त्याचा प्रारंभ झाला आहे. गोव्यात अकरा तालुक्यांत एक हजार ‘बिमा सखीं’ची म्हणजेच एलआयसी एजंटची नियुक्ती होणार आहे. महिलांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे महिलांना आकर्षित करण्यासाठी स्टायफंड (विद्यावेतन) दिले जाणार आहे. तीन वर्षे प्रशिक्षणासाठी या विद्यावेतनाद्वारे २ लाख १६ हजार रुपये महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे या महिला आपोआप लखपती बनणार आहेत. याशिवाय एजंट झाल्यानंतर २४ पॉलिसी केल्यानंतरही वर्षाकाठी त्यांना ४८ हजारांचा बोनस मिळणार आहे, हे खरे तर महिलांना आकर्षित करणारी आणि एलआयसीकडे ओढण्याचा हा प्रयत्न असला तरी त्यामागील वेगवगेळी कारणे आहेत. महिला वर्ग कोणतेही काम अत्यंत सचोटीने आणि कष्टाने करतात आणि हा घटकच मतदानातील एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे. त्यामुळेच सरकारने हेच हेरले असावे असे स्पष्ट दिसत आहे. ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज: बेपत्ता बासुदेव गेला कुठे?

‘कॅश फॉर जॉब’चा विसर

राज्यात दोन महिन्यापूर्वी ‘कॅश फॉर जॉब’ या प्रकरणाने खळबळ माजवून दिली होती. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत यामध्ये गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही. त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणाही करून मोकळे झाले होते. त्यानंतर पोलिसांत दरदिवशी तक्रारी दाखल होऊ लागल्या व दलालांची धरपकड सुरू झाली. या प्रकरणी सुमारे ३० हून अधिक तक्रारी नोंद झाल्या आहेत. संशयित दलालही जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणातील पोलिस चौकशी सुरू आहे. मात्र, अजूनही एका प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले नाही. संशयित जामिनावर असल्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळमर्यादा नसते. त्यामुळे तपासकामाची पोलिसांनाही घाई नसते. आता हे प्रकरण विरोधकही विसरून गेले आहेत. त्यामुळे पोलिसांवर तपासकामाचे असलेले दडपणही कमी झाले आहे. तपासकाम सुरू राहील. मात्र, तक्रारदारांना पैसे मिळतील की नाही याची शाश्‍वती कोण देणार? ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: गोव्यातील सर्वात जुन्या पक्षाच्या पदरी तडजोडच? भाजपच्या पंखाखाली 'मगो'चा 'सेफ गेम'

तुम्हाला चिंता का?

राज्यात मंत्रिमंडळ बदलाची चर्चा मागील वर्षांपासून सुरू असून हा प्रश्‍न आता गोव्यातील प्रत्येकासाठी चर्चेचा ठरला आहे. कट्टप्पाने बाहुबलीला का मारले हा प्रश्‍न जसा साऱ्या देशाला पडला होता तसाच प्रश्‍न आता मंत्रिमंडळ बदल कधी होणार याबाबतचा प्रश्‍न साऱ्या गोमंतकीयांना पडला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे सदोदित लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगत हा प्रश्‍न ताणत आहेत. आता जर कोणी मंत्रिमंडळातील बदलाबाबत विचारले, तर मंत्रिमंडळ बदलाची चिंता तुम्हाला का लागलीय? असे ते विचारत आहेत. पहिल्यांदा मंत्रिमंडळात बदल होणार म्हणून सांगायचे आणि नंतर पुन्हा तुम्हाला का चिंता म्हणून विचारायचे? हे योग्य आहे का? अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com