Kala Academy: कला अकादमी रंगमंचाचे छत कोसळले; 55 कोटींचे नूतनीकरण काम वादात

सरकारवर टीकास्त्र; रुरकी आयआयटी करणार तपास
part of kala academy open hall collapsed
part of kala academy open hall collapsedDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील प्रख्यात आणि वास्तुकलेचा एक आदर्श नमुना ठरलेल्या कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब रविवारी मध्यरात्री कोसळला. त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या कामाचा संबंध ताजमहालच्या कामाशी केला होता. त्यामुळे विरोधकांना आता ऐन अधिवेशनाच्या तोंडावर या कथित ‘ताजमहाल’च्या कामावर सरकारची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे.

जुलै महिन्यातच नव्याने नूतनीकरण केलेल्या परिसराचे बहुप्रतिक्षीत उद्‍घाटन होईल असे वाटत होते. विशेषतः या कामासाठी कोणतीही निविदा न काढता तब्बल ५५ कोटी रुपये खर्चाचे काम काढल्यामुळे या प्रख्यात कला संस्थेच्या नूतनीकरणाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

part of kala academy open hall collapsed
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर जैसे थे; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक यांनी घटनास्थळी भेट दिली, परंतु अकादमीत असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांनी प्रवेशद्वाराबाहेर पत्रकार परिषद घेतली. अखेर पत्रकारांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पत्रकारांनी त्या सुरक्षारक्षकांची दमदाटी मोडीत काढीत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी शाब्दिक वादही झाला.

निकृष्ट काम झाल्याबद्दल लेखी तक्रारी केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांमध्ये तुतू-मैमै सुरू आहे. जे निकृष्ट काम सुरू आहे, ते पडत आहे. कला अकादमी २०२१ पासून चर्चेत आहे. वास्तुविशारद चार्ल्स कुरैया फाउंडेशनने या कामाविषयी आक्षेप घेत प्रश्‍न उपस्थित केले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की ‘शेवटी, दोष आपल्यावरच ठेवला जाणार आहे, असे आम्हाला वाटते.’

२०२१ पासून या कामाला सुरवात झाली आहे, एका वर्षांत हे काम पूर्ण होणार असे सांगितले गेले, पण त्याला दोन वर्षांचा काळ घेतला गेला. त्यामुळे दोन पावसाळे या इमारतीच्या स्लॅबने खाल्ले. कंत्राटदाराने इमारतीवर कागद टाकून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण झालेल्या कामाविषयी साबांखाच्या अभियंत्याने लाल शेराही मारला आहे. वापरलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामात मजबूतपणा येण्यासाठी योग्य पद्धतीने साहित्याचा वापर व्हायला हवा होता, ते झालेले नाही, असेही काही साबांखाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.

गोवा फॉरवर्ड जाणार न्यायालयात

कला अकादमीच्या नूतनीकरण करण्यात येत असलेल्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात जाणार असल्याची माहिती गोवा फॉरवर्डच्या वतीने आज देण्यात आली. याप्रकरणी कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची त्वरित मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही गोवा फॉरवर्डने केली आहे.

अनेकांची धाव; पण गावडे फिरकलेच नाहीत

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत तरी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे मात्र अकादमीकडे फिरकले नव्हते

श्‍वेतपत्रिका काढणार : काब्राल

कला अकादमीच्या कामात अगोदरच विलंब होत राहिला आहे. जे काम झाले, त्याबाबत आता प्रश्‍न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी याविषयी अधिक गोंधळ उडू नये म्हणून अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी श्‍वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नूतनीकरणाचे काम झाल्यानंतर बांधकाम खाते ही इमारत कला अकादमीच्या स्वाधीन करेल. त्यामुळे कला अकादमी कधी सुरू होईल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही, असे काब्राल यांनी नमूद केले.

न्यायालयीन चौकशी करा : युरी

कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत हलक्या दर्जात सुरू होते. आम्ही या कामाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. सरकारची ही मोठी चूक आहे. याविषयी विधानसभेत आम्ही आवाज उठविणार आहोत. भाजप सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्व ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. या घटनेची न्यायालयीन चौकशी होऊन जे या प्रकारास जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

आपण कोसळलेल्या कामाची पाहणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान कार्यकारी अभियंते उत्तम पार्सेकर हे कला अकादमीमध्ये तपासणी करत आहेत. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील तपशील देऊ, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

इमारत नूतनीकरणाच्या कामामुळे दोन वर्षांहून अधिक काळ कला अकादमी रिकामी आहे. कोसळलेला स्लॅब हा सध्या नूतनीकरण केले जात असलेल्या मुख्य ऑडिटोरियमचा भाग नाही. आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे, त्यानंतर त्यावर बोलणे अधिक उचित ठरेल.

- गोविंद गावडे, कला व संस्कृतीमंत्री

स्वतंत्र एजन्सीची केली नियुक्ती

कला अकादमी स्लॅब कोसळण्याच्या घटनेचा तपशीलवार तपास करण्यासाठी आणि तत्काळ घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आज आयआयटी-रुरकी या स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती केली. कंत्राटदार मेसर्स टेकटॉन बिल्डर्स प्रा. लि., ला या घटनेचे सविस्तर स्पष्टीकरण उद्या मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com