
पणजी: व्यावसायिक व राजकारणी असलेला रोहन हरमलकर हा गोवा जमीन घोटाळ्यातील सूत्रधारांपैकी एक आहे. त्याने विविध मालमत्तांसाठी बनावट दस्तावेज तयार करण्याबरोबरच विक्री दस्तावेजामध्ये फेरफार करण्यामध्ये सामील आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात त्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना केला आहे.
सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी (१८ रोजी) अपूर्ण राहिल्याने ती आता शुक्रवारी (२० रोजी) न्यायालयात होणार आहे.
संशयित रोहन हरमलकर याने कायदेशीर वारसांची तोतयागिरी करणे, सरकारी शिक्के बनावट करणे व या बनावट दस्तावेजांचा वापर करून बेकायदेशीरपणे मालमत्ता मिळवल्या आहेत.
त्यामध्ये गोव्यातील हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४२६/५, ४४४/८, २८९/१ आणि ४२८/१८ आणि गोव्यातील सर्व्हे क्रमांक ४९/० (जुने) हडफडे गाव आणि इतर अनेक अघोषित मालमत्तांचा समावेश आहे.
या फसव्या कारवायांमुळे रोहन हरमलकरने ८.२५ कोटी रुपयांचे गुन्ह्यातून उत्पन्न मिळवले आहे. जमीन हडपप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत, त्यांचा संशयित हरमलकर याच्याशी संबंध आहे.
त्याच्या घरावर व कार्यालयात घालण्यात आलेल्या छाप्यावेळी जमिनीसंदर्भातचे काही संशयास्पद दस्तावेज, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती. ईडीसह गोवा पोलिसांनीही संशयिताविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत.
आतापर्यंत केलेल्या ‘पीएमएलए’ चौकशीतून असे दिसून आले आहे की, संशयित मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी आहे.
या प्रकरणातील तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे आणि संशयिताला जामीन दिल्यास त्यात अडथळा निर्माण होईल आणि संशयित स्वतःच्या आणि इतर संशयितांच्या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी करू शकतो. शिवाय, जर संशयिताला जामिनावर मुक्त केले गेले तर पुराव्यांशी छेडछाड करण्याची आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे, असे उत्तर ‘ईडी’ने जामिनाला विरोध करताना दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.