पणजी : गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेने खराब रस्त्यांवरील उखडलेले डांबरीकरण सपाटीकरणाचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ज्याठिकाणी खड्डे पडले आहेत, तेही बुजवण्याचे काम सध्या गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. कदंब बसस्थानक परिसरात खराब झालेल्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले आहे.
पावसाने काही दिवसांपासून ओढ दिली असल्याने त्याचा उपयोग मनपाने करून घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामेही महापालिकेने या दिवसांत केली आहेत. त्याशिवाय अनेक ठिकाणी गटारांतून अडकून पडलेले साहित्य बाहेर काढण्याचे काम करण्यात कर्मचारी व्यस्त होते. काही आठवड्यांपूर्वी पावसात आंबेडकर उद्यान व मल्टिपर्पज हॉल येथील नव्याने केलेले डांबरीकरण उडून गेले होते. त्यामुळे येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला होता, त्याचेही आता डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय मळा परिसरातील पावसाने खराब झालेल्या रस्त्यावर टप्प्याटप्याने पेव्हर्स टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एका बाजूला केलेले डांबरीकरण उखडून गेले आहे, ते जेसीबीच्या साहाय्याने काढून त्यावर पुन्हा डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. आल्तिनो परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता अजूनही खराब झाला असून, त्यावरील खडी निसटलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर सांतइनेज भागातही अद्याप खराब रस्त्यावर धूळ उडण्याचे प्रकार सुरू असल्याने दुचाकीस्वारांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.