
Baina flyover exit gate issue
वास्को: मंगळवारी (ता. २१) उद्घाटन करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या खालील रस्त्याच्या एक्झिट भागात मुरगाव बंदर प्राधिकरणाने मोठे लोखंडी गेट उभारल्याने तेथे वाद निर्माण झाला आहे. सदर गेट काढावे अन्यथा आम्ही ते काढून टाकू, असा इशारा नगरसेवक दीपक नाईक व इतरांनी दिला आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सदर गेटसंबंधी प्रश्न उपस्थित करून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार कृष्णा साळकर यांनी दिले असल्याचे नाईक यांनी सांगितले. दरम्यान सध्या त्या गेटसंबंधीचे इतर काम बंद ठेवण्यात आले आहे.
या उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले होते. मडगावहून येणारी वाहने बायणा रवींद्र भवनावरील उड्डाण पुलावर आल्यावर ती मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील रेल्वे यार्डालगत बांधलेल्या पुलावरून खालील रस्त्यावर उतरणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते.
मंगळवारी उद्घाटन झाल्यानंतर प्राधिकरणाने त्या ठिकाणी सिमेंट वीटांचा वापर करून भिंत उभारल्यावर तेथे मोठी लोखंडी गेट घालण्याचे काम सुरू केले. तेथे गेट घालण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांनी सांगताच नगरसेवक दीपक नाईक, नगराध्यक्ष गिरिष बोरकर, नगरसेवक रामचंद्र कामत वगैरे तेथे आले. त्यावेळी कंत्राटदाराने आपणास प्राधिकरणाने सदर गेट उभारण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याशी बोरकर यांनी संपर्क साधून सदर गेटसंबंधी विचारणा केली असता, त्यांनी उडवाऊडवीची भाषा वापरली.
तुम्ही प्राधिकरणाच्या भिंतीलगत गाडे उभारण्यापूर्वी प्राधिकरणाची परवानगी घेतली होती काय असा प्रश्न उपस्थित केला. त्या अधिकाऱ्याला बोरकर यांनी चर्चेसाठी बोलाविले असता त्यांनी मोबाईल बंद केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.