फोंडा : कृषीमंत्री रवी नाईक यांचे सुपूत्र रितेश नाईक यांची फोंड्याच्या नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. फोंडा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव 8 मार्च रोजी शुक्रवारी 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला.
गेला बराच काळ हुलकावणी देत असलेली फोंडा पालिका आता भाजपच्या ताब्यात आली असून मगो समर्थक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाला हटवल्याने आता फोंडा पालिकेवरील मगो पक्षाचे (MGP) वर्चस्व गेले आहे. आता फोंड्यात भाजपराज निश्चित झाले असून नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागली आहे.
फोंडा (Ponda) पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध रितेश नाईक, विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, यतिश सावकार, विलियम आगियार, अर्चना नाईक डांगी आणि चंद्रकला नाईक यांनी गेल्या 1 एप्रिल रोजी अविश्वास ठराव आणला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी पालिकेत खास बैठक बोलावण्यात आली. यावेळी अविश्वास ठराव आणलेले आठही नगरसेवक तसेच व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक मिळून एकूण नऊ नगरसेवकांनी बैठकीला उपस्थिती लावली. नियमाप्रमाणे बैठकीचे कामकाज घेऊन ठरावाचा निकाल लावण्यात आला, त्यावेळेला ठरावावर सही न केलेले व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी ठरावाच्या बाजूने समर्थन दिले, त्यामुळे अविश्वास 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला.
फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर यांची केवळ तीन महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली. उपनगराध्यक्ष असलेल्या जया सावंत यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. या पालिका मंडळात आतापर्यंत पाच नगराध्यक्ष फोंडा पालिकेने पाहिले असून त्यात प्रदीप नाईक, व्यंकटेश नाईक, विश्वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर आणि गिताली तळावलीकर यांचा समावेश आहे. आता भाजपकडून (BJP) रितेश नाईकांच्या रुपाने सहाव्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.