Goa News : हातून गंभीर गुन्हा घडल्यानंतर शिक्षा भोगण्यास गुन्हेगार तुरुंगात येतो. प्रत्येक वेळी तुरुंगात येणारी व्यक्ती प्रवृत्तीने वाईटच असते, असे बिलकूल नाही. परिस्थितीमुळे गुन्हेगार बनलेलेही कमी नसतात. अशा व्यक्तींना प्रायश्चित्त मिळावे आणि त्यांच्यातील ‘माणूस’ जागा व्हावा अशा उद्देशाने तुरुंग उभारले गेले. गोव्यात सडा-वास्को येथे पूर्वी ती व्यवस्था होती.
जे-जे प्रकार घडू नयेत, असे सर्व तेथे घडत होते. कालांतराने कोलवाळ येथे अत्यंत सुसज्ज तुरुंग उभारण्यात आला. कारागृहातील कैद्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु तुरुंगात अराजकता आणि माजलेली बजबजपुरी आणखी वाढली आहे.
कोलवाळ कारागृहातील दवाखान्यात एका कैद्याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. तुरुंगात होणाऱ्या त्रासाला कंटाळून कैद्याने टोकाचे पाऊल उचलले, अशी एक अटकळ समोर आली.
तुरुंग प्रशासनाला लाभलेली अलिखित स्वायत्तता व अलिप्ततेमुळे त्याची सहजपणे पृच्छा करता येत नाही. परंतु सातत्याने समोर येणारे गैरप्रकार त्याला पुष्टी देण्यास पुरेसे ठरतात. कोलवाळ तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्था असूनही कारागृहात मोबाइल, कैद्यांना अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आले आहेत.
कैदी शस्त्र बाळगतात, धाकदपटशा सुरू असतो. हाणामाऱ्यांसारखे कित्येक प्रकार घडत असावेत, जेव्हा एखाद्यास उपचारांसाठी बाहेर न्यावे लागते, तेव्हा त्याचा उगलडा होतो. हे सारे थांबणार कधी? समस्येची दखल सरकारला घ्यावीशी वाटत नाही.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याविषयी इतर कैद्यांनी जेलरना माहिती दिली. जेलरने ती तुरुंग अधीक्षकांना दिली. त्यांना येण्यास बराच उशीर झाला. आल्यानंतर त्यांनी कैद्याला खोलीतून बाहेर काढण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उपस्थित कैद्यांकडे चौकशी केली.
दवाखान्यात येणाऱ्या, जाणाऱ्यांसाठी नोंदवही ठेवलेली असते. अधिकाऱ्यांना झालेला उशीर नोंद होऊ नये म्हणून ही नोंदवही गायब होती, अशी माहितीही समोर आली आहे.
जेलमध्ये प्रशासकीय स्तरावर दोन गट पडले आहेत. त्यांच्या माध्यमातून गैरकृत्ये माध्यमांपर्यंत पोहोचतात. कारागृहातील कर्मचाऱ्यांचेच या कैद्यांशी साटेलोटे असल्याने सर्व काही अनेक वर्षे चिडिचूप सुरू आहे.
कारागृहात वाढदिवस व ओल्या पार्ट्या तसेच मोबाइलचा सर्रास वापर होत असूनही तुरुंग कर्मचाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही, हे दुर्दैवी आहे. मध्यंतरी तुरुंग परिसरात मोबाइल जॅमर बसवले जाणार, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात कार्यवाहीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जुने कैदी, नवीन कैद्यांवर रॅगिंग करतात.
लैंगिक अत्याचार घडल्याचीही उदाहरणे आहेत. तंबाखूपासून ड्रग्जपर्यंत प्रत्येक वस्तू तुरुंगात मिळते. त्यासाठी खास दर ठरलेले आहेत. मुद्दा असा की- कैदी येतात, जातात; परंतु अराजकतेची परंपरा अखंडित राहते. त्याचे कारण अवघड नाही. गोव्यात तुरुंग एकच आहे.
महानिरीक्षक वगळता इतर कर्मचारी हे वर्षानुवर्षे तेथे ठाण मांडून आहेत. त्यांची इतरत्र बदलीही होऊ शकत नाही. तुरुंगात निर्माण होणाऱ्या अराजकतेला तेच जबाबदार आहेत. निवृत्त अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी दोन वर्षांपूर्वी महानिरीक्षक पदाचा ताबा घेतल्यावर सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यांनाही ते शक्य झाले नव्हते.
सरकारने सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने तुरुंगाला अत्याधुनिकतेचा साज देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. मात्र, मूळ कीड काढल्याशिवाय सकारात्मक परिणाम दिसणे अशक्य आहे. कोलवाळ कारागृहातील व्यवस्थापन व प्रशासन यांची झाडाझडती सरकार घेणार का, तसे असल्यास ती कोण घेणार? घेतलीच तर त्यातून जे निष्पन्न होईल, त्यावर आधारित काही उपाययोजना केली जाईल का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजवरच्या अनुभवांवरून नकारार्थीच येतात. आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, चौकशीही होणार नाही, याची खात्री झालेले मुजोर अधिकारी तुरुंगात जी बेबंदशाही चालवतात, त्याला कधीतरी छोटीशी वाचा फुटते. पुन्हा सगळे आलबेल होते. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण परिस्थितीत सुधारणा होणे ना गुन्हेगारांच्या सोयीचे असते ना अधिकाऱ्यांच्या.
येथे आलेला गुन्हेगार समाजात परत जाताना सुजाण नागरिक बनून जावा, ही अपेक्षा बाजूलाच राहते; उलट तो आधी होता त्यापेक्षाही अधिक मुर्दाड बनून बाहेर पडतो. तुरुंग म्हणजे गुन्हेगारांसाठी सुट्टी घालवायचे ठिकाण बनले आहे. जो गुन्हा तो बाहेर घाबरत घाबरत करतो असतो, तोच गुन्हा इथे तो संरक्षणात राहून करतो.
अर्थात याला गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेला, आडवळणाचा कैदी बळी पडतो. त्याला आपल्या क्षणिक अपराधाची उपरती होण्याऐवजी तो स्वत: अट्टल गुन्हेगार होऊन बाहेर पडतो किंवा आत्महत्या करतो. या बंदीशाळेत कुणीही भला-चांगला नाही. सगळे पथ चुकलेलेच आहेत.
अशा ठिकाणी गेलेल्याला जग नकोसे होते आणि तुरुंग प्रिय होतो. अर्थात हे सुशासनाचे लक्षण नाही. समाज व व्यवस्था सडल्याचेच ते द्योतक आहे. फक्त यांना शिक्षा कोण करणार, हाच प्रश्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.