मडगाव: मडगाव नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सोनसोडोवर बांधावयाची शेड व तेथील रस्ता बांधकामावरून प्रचंड गदारोळ झाला. ते प्रकरण नेमके कुठे पोहोचले ते जाणून घेण्यासाठी ‘त्या’ फाईल्स सादर करण्याची मागणी तमाम नगरसेवकांनी लावून धरली. मात्र, फाईल्स सापडत नसल्याचे उत्तर मिळाल्यावर संतप्त नगरसेवक संबंधित अभियंत्याच्या कक्षात गेले व तेथे असंख्य गहाळ फाईल्स लपवून ठेवलेल्या आढळल्या. त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
गहाळ फाईल्स फाईल्स अभियंत्याच्या नंतर सर्व नगरसेवकांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्याची रवानगी सोनसोडोवर करून त्याच्याकडे तेथील कचरा व्यवस्थापन सोपवावे व कचरा व्यवस्थापनाबाबत उच्च न्यायालयात येणारी सर्व प्रकरणे त्याने हाताळावीत, अशी मागणी लावून धरली व तसा ठरावही घेण्यात आला. तसे लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर करावे, असे ठरले. यावेळी नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी बुधवारी पालिका प्रशासन संचालकांकडील बैठकीत आपणाला पालिकेचा तांत्रिक विभाग कोणत्याही बाबतीत सहकार्य करत नाही, अशी तक्रार केल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पालिका अभियंत्याच्या बदलीचा आदेश त्यापूर्वीच निघाला आहे, त्याचा या बैठकीशी संबंध नसावा असे त्यांनी स्पष्ट केले.
...म्हणे फाईल्स चुकून राहिल्या!
गहाळ फाईल्स सापडल्यानंतर सर्व नंतर सभागृहात आणल्या व सदर अभियंत्याकडे स्पष्टीकरण मागितले असता त्या चुकून राहिल्याची सारवासारव केली. यावेळी सर्वच नगरसेवकांनी सदर अभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी केली. अखेर त्याला पालिका कार्यालयातून सोनसोडोवर हलविणे व तेथील तसेच एसजीपीडीए बाजारात उभारल्या जात असलेल्या प्रकल्पावर तैनात करणे व कचरा व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयात येणाऱ्या सर्व सुनावण्या त्याच्याकडे सोपवणे व याबाबत उच्च न्यायालयाला कळवणे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
अखेर गहाळ प्रकरणाचे कोडे सुटले
मडगाव नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून गहाळ होणाऱ्या फाईल्सचा मुद्दा गाजत होता. आज अशा फाईल्सबाबत बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. पालिकेने थकबाकी वसुली मोहीम राबविली. मात्र, अनेकजणांना त्यांच्या बांधकाम नूतनीकरणाच्या फाईली न सापडल्याने थकबाकी न भरता परत जावे लागले. एक बांधकाम ठेकेदार तर तब्बल ४५ लाख शुल्क भरण्यासाठी आला होता. पण, त्याची फाईल सापडत नव्हती. पालिकेतील सर्वांनाच या फाईली गहाळ होण्याचे कोडे सुटत नव्हते. पण, आज सदर अभियंत्याच्या कक्षात फाईल्सचे घबाडच सापडले व ते कोडे सुटले.
परस्पर जात होत्या फाईल्स?
दामोदर शिरोडकर यांनी सांगितलेला किस्सा तर त्याहून गंभीर होता. मडगाव पालिकेत विविध अभियंत्यांना प्रभाग वाटून दिलेले आहेत. त्यानुसार त्या प्रभागातील कामाची जबाबदारी त्या अभियंत्याने पाहावयाची असते. पण, शिरोडकर यांच्या प्रभागांतील एका कामाची फाईल इनवर्ड झाली. त्यांचा प्रभाग ज्या अभियंत्याकडे होता त्यांच्याकडे ती न जाता वरील प्रकाश देसाई यांच्याकडे कशी गेली? तसे असेल तर अभियंत्यांना प्रभाग का वाटून देता? असा सवाल केल्यावर यापुढे असे होणार नाही, असे निर्देश नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
... आणि वाढला संशयकल्लोळ!
काल पालिकेची बैठक सुरू झाली तेव्हाच सगुण नायक यांनी सोनसोडोवरील रस्ता व शेडीचा मुद्दा उपस्थित करून पालिकेने पंधरा दिवसांत ती कामे पूर्ण करण्याबाबत उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राची आठवण करून दिली. ते काम कुठपर्यंत पोहोचले त्याचा तपशील मागितला. पण, संबंधित विभागाकडून नेहमीसारखी सारवासारव होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दामोदर शिरोडकर, घनःश्याम शिरोडकर, पूजा नाईक काणेकर यांनी आवाज वाढवून ते काम कुठपर्यंत पोहोचले आहे, त्याची खात्री करण्यासाठी सदर फाईल्स बैठकीत सादर करण्याची मागणी केली.
एकमेकांकडे अंगुलीनिर्देश
यावेळी पालिका अभियंता दिनीज डिमेलो यांनी त्याबाबत उलट सुलट माहिती देण्याचा प्रयत्न करताना ती फाईल आपण मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविली होती. मात्र, ती परत आलीच नाही, असे सांगितले. तर मुख्याधिकाऱ्यांनी ती आपल्याकडे आलीच नाही, असेही स्पष्ट केले. शेवटी सर्वांचा रोख ते काम पाहणारे कनिष्ठ अभियंता विकास प्रभुदेसाई यांच्याकडे वळला. संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यांना ती फाईल शोधून आणण्याची सूचना केली. तरीही त्यांनी टंगळमंगळ करण्यास सुरवात केली. अखेर नगराध्यक्षांनी दम भरताच दुसऱ्या कुणाला तरी फाईल्स शोधण्यास पाठविले.
फाईल्स सापडल्या तळमजल्यावर
फाईल्स शोधण्यास पाठविल्यानंतर दरम्यानच्या काळात बैठकीतील अन्य विषय चर्चेत घेऊन ते हातावेगळे केले, तरी फाईल आली नाही. मात्र, फाईल्स बैठकीत आणल्याशिवाय बाहेर जायचे नाही, असा निर्धार नगरसेवकांनी केला. दामोदर शिरोडकर व सगुण नायक यांनी सदर विभागात जाऊन ती फाईल शोधण्याचे सूचविले व नगराध्यक्षांसह सगळे तळमजल्यावरील अभियंत्याच्या कक्षांत गेले व तेथे फाईल्सचा शोध घेतला असता सदर फाईलची नोंद तेथे सापडली. बांधकाम विषयक गहाळ म्हणून सांगितल्या जाणाऱ्या असंख्य फाईली तेथे सापडल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.