

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर आणि विश्वेश नाईक-अजय खोलकर गटातील वाद पुन्हा पेटला आहे. बोरकर गटाच्या ज्या दहा जणांचे निलंबन करण्यात आले होते, त्यातील काही जणांनी नाईक आणि खोलकर यांच्याविरोधात अब्रु नुकसानीसह पक्षाच्या निधीत गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली.
पक्षातील वाद उफाळून आल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देत, राजकारणातून सक्रिय संन्यास घेतलेले मनोज परब यांची मंगळवारी खजिनदार अजय खोलकर यांनी भेट घेतलेली होती. त्यानंतर खोलकर यांना पाठवलेली निधीच्या गैरवापराविषयी असंतोष व्यक्त करणारी सरचिटणीस विश्वेश नाईक यांची पोस्ट समोर आली.
त्यामुळे निलंबित केलेल्या ल्युसियो रॉनकॉन, सॅम नाईक, डॅग्ली फर्नांडिस, मेल्विन डिसिल्वा यांनी पणजी पोलिस स्थानकात नाईक आणि खोलकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीसह निधीत गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली.
‘पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते. त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे लागते. त्यानंतरच निलंबनाची प्रक्रिया पुढे न्यावी लागते. असे असतानाही पक्षाने आम्हाला तडकाफडकी बेकायदेशीरपणे निलंबित केले’ असा दावा ल्युसियो रॉनकॉन यांनी केला.
आरजी पक्ष तळागाळात नेण्यासाठी आम्ही सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. पक्षाच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी सर्व माहिती वेबसाईटवर टाकण्याची हमी आम्हाला देण्यात आली. परंतु, ती माहिती वेबसाईटवर टाकली गेली नाही. शिवाय तांत्रिक कारण समोर करत मार्चमध्ये वेबसाईटही बंद करण्यात आली. त्यामुळेच आम्ही निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे, असे रॉनकॉन म्हणाले.
...म्हणून दाखल केली तक्रार : लुसिओ
पक्षातील वाद शिगेला पोहोचल्यानंतर सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्यावर आणि आदित्य देसाईंवर बिनबुडाचे आरोप केले. कोणताही पुरावा न देता त्यांनी आमच्यावर आरोप केल्यामुळेच आम्ही नाईक आणि खोलकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे, असेही लुसिओ रॉनकॉन यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.